SIR Process : निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेच्या (SIR Process) दुसऱ्या टप्प्यात तब्बल १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रारूप मतदार यादीतून सुमारे ६.५ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. २७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेपूर्वी संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण ५०.९० कोटी मतदार नोंदणीकृत होते. मात्र प्रारूप याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर ही संख्या थेट ४४.४० कोटींवर आली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे ‘एएसडी’ म्हणजेच अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार नोंदणी असलेल्या श्रेणीत टाकण्यात आली आहेत. आयोगाने याआधीच स्पष्ट केले होते की, एसआयआर प्रक्रियेत ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात गणना फॉर्म संकलनाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे, याचा थेट परिणाम मतदार संख्येवर झाला आहे. उत्तर प्रदेशात या प्रक्रियेचा सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीतून २.८९ कोटी मतदार वगळण्यात आले असून, १२.५५ कोटी मतदार कायम ठेवण्यात आले आहेत. पूर्वी नोंद असलेल्या १५.४४ कोटी मतदारांपैकी १८.७० टक्के मतदार मृत्यू, कायमस्वरूपी स्थलांतर किंवा एकापेक्षा अधिक नोंदणीमुळे यादीतून वगळले गेले आहेत. कारवाईला विशेष महत्त्व एसआयआरचा दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सुरू झाला आहे. आसाममध्ये स्वतंत्र विशेष पुनरीक्षण प्रक्रिया राबवली जात आहे. निवडणूक आयोगानुसार, ही एसआयआर प्रक्रिया भविष्यातील अंतिम आधार ठरणार असून, तिचा मुख्य उद्देश जन्मस्थान तपासून परदेशी अवैध स्थलांतरितांना मतदार यादीतून वगळणे हा आहे. बांगलादेश व म्यानमारमधील अवैध स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.