Vidhan Parishad Election : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेनेच्या कोट्यातील एका जागेसाठी नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यातील एका बड्या नेत्याला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Vidhan Parishad Election) मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपकडे, दोन शिवसेनेकडे, तर उर्वरित जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता आहे. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर भाजपची संख्या सहा होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेकडील दोन जागांपैकी एक जागा साताऱ्याला देण्याचा विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, फलटणच्या ‘धाकट्या राजें’चे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. (Vidhan Parishad Election) दरम्यान, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर समीकरणे बदलली आहेत. आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबतचे मतभेदही उघड झाले आहेत. अलीकडेच झालेल्या सातारा दौऱ्यातही महेश शिंदे अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा परिस्थितीत पक्षवाढीच्या दृष्टीने नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा विचार शिवसेनेकडून केला जाऊ शकतो. (Vidhan Parishad Election) दरम्यान, माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या गटाच्या शिवसेनेत प्रवेशानंतर राजे गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नावही चर्चेत असून, त्यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच, शिवसेनेच्या अंतर्गत समीकरणांवर आणि साताऱ्यातील राजकीय घडामोडींवर आगामी निर्णय अवलंबून असणार असून, अंतिम उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vidhan Parishad Election)