Shiv Sena : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (Shiv Sena) निवडणुकीला केवळ दोन दिवस शिल्लक असतानाच पॅनल क्रमांक १८ मध्ये मोठा राजकीय वाद उफाळून आला आहे. महायुतीच्या अधिकृत पॅम्प्लेटमध्ये खोडसाळपणे फेरफार करून बनावट पॅम्प्लेट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेमुळे मतदारांसह कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बनावट पॅम्प्लेटमुळे निर्माण झाला संभ्रम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पॅनल क्रमांक १८ मध्ये भाजपची एक जागा (रेखा चौधरी) आधीच बिनविरोध निवडून आली आहे. उर्वरित तीन जागांसाठी मात्र चुरसपूर्ण लढत होत आहे. यामध्ये दोन शिवसेना आणि एक भाजप उमेदवार रिंगणात आहेत. नेतीवली परिसरात सोशल मीडियावर एक बनावट पॅम्प्लेट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या पॅम्प्लेटमध्ये महायुतीच्या अधिकृत प्रचार साहित्यातील दोन धनुष्यबाण (शिवसेना) आणि एक कमळ (भाजप) चिन्ह दाखवण्यात आले आहे. मात्र, विशेष म्हणजे भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहल मोरे यांच्या जागी कमळाऐवजी शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार प्रीती मनोज चौधरी यांचे कपाट चिन्ह दाखवण्यात आले आहे. त्यासोबत “आमचं ठरलंय” असा मजकूरही टाकण्यात आला आहे. या बनावट प्रचार साहित्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही तीव्र नाराजी आणि तणाव दिसून आला. महायुतीच्या नेत्यांची तीव्र प्रतिक्रिया या प्रकरणावर महायुतीच्या उमेदवारांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. भाजपचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, शिवसेना उमेदवार मल्लेश शेट्टी, नवीन गवळी आणि भाजप उमेदवार स्नेहल मोरे यांनी संयुक्तपणे म्हटले की, “पराभवाच्या भीतीने हा खोडसाळपणा करण्यात आला आहे. महायुती मजबूत आहे आणि अशा प्रकारांमुळे मतदारांची दिशाभूल होणार नाही.” त्यांनी दोषींविरोधात निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही दिला. मनोज चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी या संपूर्ण वादानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे गटाने) त्वरित कारवाई करत मनोज चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मनोज चौधरी हे शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख तसेच परिवार सभापती आहेत. पक्षविरोधी कारवाई आणि आदेश न पाळल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज चौधरी आणि अपक्ष उमेदवार प्रीती मनोज चौधरी यांनी सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, “आम्ही किंवा आमच्या समर्थकांनी कोणताही बनावट पॅम्प्लेट तयार केलेला नाही. आमच्या प्रचार रॅलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधक घाबरले असून, त्यामुळेच आमच्यावर बिनबुडाचे आरोप लावले जात आहेत.” त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांमार्फत व्हावी, अशी मागणी केली आहे. राजकीय वातावरण तापले; कारवाईकडे लक्ष मतदानाच्या तोंडावर पॅनल १८ मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, निवडणूक आयोग आणि पोलिसांची पुढील कारवाई काय होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.