मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पत्नी तथा ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या आणि माजी मंत्र्यांच्या शालिनीताई पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या.गेल्या काही काळापासून शालिनीताई आजारी होत्या. मुंबईतील माहिम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शालिनीताई पाटील यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांनी वसंतदादा पाटील यांना राजकीय आणि वैयक्तिक जीवनात खंबीर साथ दिली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे.महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शालिनीताईंच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण हरपली शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला होता, मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता. शालिनीताई पाटील यांची राजकीय कारकीर्द डॉ. शालिनी वसंतदादा पाटील ह्या एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राच्या माजी महसूल मंत्री होत्या. त्या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केलेल्या मानते जाते. जिजाबाई भोसले यांच्यावर सर्वप्रथम पहिला चरित्र ग्रंथ लिहणाऱ्या लेखिका शालिनीताई पाटील आहेत. त्या वसंतदादाच्या दुसऱ्या पत्नी होत्या, त्यांचा प्रथम विवाह एक न्यायाधीशासोबत झाला होता मात्र लग्नानंतर काही दिवसात नवऱ्याचे निधन झाले. पाटील ह्या बॅरिस्टर व कायदा निष्णात होत्या. पुढे त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी लागली, पुढे त्या मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या त्या पीए झाल्या.वसंतदादा व शालिनी यांनी विधवा पुर्नविवाह मोहिम त्या काळात राबवत त्यांनी कायद्याने विवाह केला होता. तसेच त्यांनी २००९ मध्ये स्वतःचा क्रांतीसेना महाराष्ट्र पक्ष स्थापन केला होता.