LPG Shortage: व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूरसह राज्यातील अनेक शहरांमधील हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय संकटात सापडला आहे. पुरवठा दोन दिवसांत सुरळीत न झाल्यास मुंबईतील जवळपास ५० टक्के हॉटेल व रेस्टॉरंट तात्पुरती बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा उद्योग संघटनांनी दिला आहे. पाच मार्चच्या अधिसूचनेनंतर संभ्रम हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन (वेस्टर्न इंडिया) (एचआरएडब्ल्यूआय) च्या म्हणण्यानुसार, केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ५ मार्च रोजी एक अधिसूचना जारी केली. त्यानंतर पुरवठादार आणि वितरकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक वितरकांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य सेवा आस्थापनांना व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा थांबवला आहे. दिल्ली, कर्नाटक, तेलंगणातही फटका ही टंचाई केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही. दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही असाच व्यत्यय जाणवत असल्याचे वृत्त आहे. उद्योग प्रतिनिधींनी सांगितले की, छोटे व मध्यम आकाराचे रेस्टॉरंट यांच्याकडे साठवणुकीची क्षमता मर्यादित असल्याने त्यांना या टंचाईचा सर्वाधिक फटका बसणार आहे. फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे (एफएचआरएआय) उपाध्यक्ष आणि एचआरएडब्ल्यूआयचे प्रवक्ते प्रदीप शेट्टी यांनी सांगितले, “गेल्या आठवड्यापासून व्यावसायिक एलपीजीची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. काल (सोमवार) पासून अनेक भागांमध्ये पुरवठा जवळजवळ पूर्णतः ठप्प झाला आहे. पुढील दोन दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मुंबईतील जवळपास ५० टक्के हॉटेल व रेस्टॉरंट त्यांच्याकडील सिलिंडरचा साठा संपेपर्यंत तात्पुरती बंद करावी लागतील.” इंडक्शन पर्याय व्यावहारिक नाही शेट्टी यांनी पुढे स्पष्ट केले की, इलेक्ट्रिक किंवा इंडक्शन स्वयंपाकाचे पर्याय उपलब्ध असले तरी भारतीय पाककृतीसाठी आवश्यक असणाऱ्या उच्च तापमानावरील स्वयंपाकासाठी ते व्यावहारिक नाहीत. त्यामुळे या क्षेत्रासाठी एलपीजीचा अखंड पुरवठा अत्यंत आवश्यक आहे. तुटवडा कशामुळे ? इराण युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे एलपीजी वाहक जहाजे अडकली असून कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा एलपीजी आयातदार देश असून तो आपल्या ९०% पेक्षा अधिक एलपीजी पुरवठ्यासाठी मध्यपूर्वेवर अवलंबून आहे. होर्मुझमार्गे येणारी मार्च महिन्यातील जहाजे काही दिवसांत सुटली नाहीत तर परिस्थिती अधिक गंभीर होईल. भारताच्या एकूण एलपीजी आयातीपैकी ८५-९०% होर्मुझमार्गे येतो. त्यामुळे केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांना प्राधान्य देत व्यावसायिक वापरावर निर्बंध घातले आहेत. थोडक्यात, इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे होर्मुझची सामुद्रधुनी विस्कळीत झाली, भारताचा एलपीजी आयात थांबला, केंद्राने घरगुती पुरवठ्याला प्राधान्य दिले, व्यावसायिक हॉटेलांना कमी पुरवठा.