सातारा : सातारा नगरपालिका (Satara Nagarpalika Election) निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एकत्र येण्यामुळे चुरस कमी असली तरी निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. निकाल जाहीर झाला आणि भाजपच्या उमेदवार अमोल मोहिते (Satara Nagarpalika Election) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुवर्णा पाटील यांचा दारुण पराभव करत नगराध्यक्षपद पटकावले. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साताऱ्यात यावेळी दोन्ही राजे एकत्र आल्याने प्रतिस्पर्ध्यांची पूर्ण धूळधाण उडाली. सातारा नगरपालिकेत एकूण २५ प्रभागांमधून ५० नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजप पॅनेलविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार आव्हान उभे केले होते. प्रचारात दोन्ही बाजूंनी चांगलीच रंगत आणली होती. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शहरभर मोठ्या ताकदीने प्रचाराची सूत्रे हाती घेतली, तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सभा घेऊन जोरदार हल्ला चढवला. राष्ट्रवादीच्या सभांमध्ये दोन्ही राजे निशाण्यावर होते. मात्र, मतदारांनी राजेंच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास टाकत भाजपला भव्य बहुमत दिले. आमदारालाही लाजवेल असा विक्रमी विजय नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सहसा ५० ते १०० मतांच्या किरकोळ फरकाने निकाल लागतात. बहुतांश ठिकाणी असे चित्र दिसते. मात्र, साताऱ्यातील मतदारांनी वेगळेच चित्र निर्माण केले. भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार अमोल मोहिते यांना तब्बल ४२ हजार मतांच्या प्रचंड फरकाने विजयी केले. सुवर्णा पाटील यांना अवघी १५,५५६ मते मिळाली. हा फरक एवढा मोठा आहे की आमदारकीच्या निवडणुकीलाही लाजवेल असा आहे. शिवेंद्रराजेंचा करिष्मा या निवडणुकीची सारी सूत्रे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडेच होती. प्रचाराचे नियोजन, रणनीती आखणी ते विजयी डावपेचांपर्यंत सर्व काही त्यांनीच हाती घेतले होते. आजारपणामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचा सक्रिय सहभाग कमी होता. त्यामुळे संपूर्ण भिस्त शिवेंद्रराजेंवरच होती. त्यांनी गृहजिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे दणदणीत कामगिरी करून दाखवली. दुसरीकडे, सुवर्णा पाटील यांना पक्षांतराचा फटका बसला. भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी फुंकली होती. पक्षांतर करताना त्या म्हणाल्या होत्या, “भाजपमध्ये अनेक वर्षे प्रामाणिक काम केले, तरी उमेदवारीच्या वेळी पक्षाने आम्हाला बाजूला सारले. राष्ट्रवादीने मात्र आम्हाला जवळ केले.” मात्र, निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या पक्षांतराला मतदारांनी स्पष्ट नापसंती दर्शवली आणि त्यांना दणका दिला. एकूणच, सातारा नगरपालिकेत राजेंच्या एकजुटीने भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. साताऱ्यातील विजयी नगरपालिका भाजपचे ७ नगराध्यक्ष विजयी म्हसवड – पुजा विरकर रहिमतपुर – वैशाली माने वाई- अनिल सावंत मेढा – रूपाली वाराघडे मलकापुर – तेजस सोनवले सातारा – अमोल मोहिते फलटण – समशेरसिंह नाईक निंबाळकर राष्ट्रवादी (अजित दादा) २ नगराध्यक्ष महाबळेश्वर – सुनील शिंदे पाचगणी – दिलीप बगाडे