Sarita Mhaske | मुंबई महापालिकेतील राजकीय स्थिती पाहता नगरसेवकांची फाटाफूट होऊ नये, यासाठी राजकीय मंडळींकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. याच दरम्यान, मुंबईतील ठाकरे गटातील महिला नगरसेवक फुटल्याची बातमी समोर आली होती. चांदिवली प्रभाग क्रमांक १५७ च्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांनी ठाकरे गटाची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले जात होते. शिवसेनेच्या (ठाकरे) गटस्थापनेच्या वेळीही त्या अनुपस्थित होत्या. एकीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ असताना दोन्ही पक्षांकडून इतर नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच म्हस्के नॉट रीचेबल राहिल्याने वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. मात्र उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सूत्र फिरवली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा म्हस्के त्यांच्या पतीसह नार्वेकर यांच्या मुंबईतील घरी दाखल झाल्या. यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत त्या उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर रवाना होणार आहेत. आता कोकण भवन येथे जाऊन सरिता म्हस्के यांचीही नोंदणी करण्यात येणार आहे. दरम्यान, म्हस्के गेल्या 24 तासांपासून नेमक्या कुठे होत्या याबाबत अद्याप अधिक तपशील मिळू शकलेला नाही. कोण आहेत सरिता म्हस्के ? Sarita Mhaske | डॉ. सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक १५७ मधून शिवसेना ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहे. म्हस्के यांनी भाजपच्या आशा तायडे यांचा १८०० मतांनी पराभव केला. सरिता म्हस्के या पेशाने डॉक्टर असून होमिओपॅथी प्रॅक्टिस करतात. कोरोना काळात त्यांनी खूप चांगले काम केलं. हेही वाचा: Mayor Reservation Lottery: राज्यातील २९ महापालिकांमध्ये महापौरपदासाठी आज सोडत; दिग्गजांची धाकधुक वाढली