बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. या प्रकरणाच्या न्यायालयीन प्रक्रियेला आता वेग आला असून, बीड येथील विशेष ‘मकोका’ न्यायालयाने सर्व आरोपींवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित केले आहेत. खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळेच ही हत्या झाल्याचा ठपका फिर्यादी पक्षाने ठेवला आहे. वाल्मिक कराडने नाकारले आरोप या सुनावणीदरम्यान एक महत्त्वाची घडामोड घडली. न्यायालयाने जेव्हा आरोपींना त्यांच्यावर लावण्यात आलेले गुन्हे मान्य आहेत का, असे विचारले, तेव्हा मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने पहिल्यांदाच न्यायालयात आपली भूमिका मांडली. कराडसह सर्व आरोपींनी एकमुखाने आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात वाल्मिक कराड याने प्रथमच स्वतःहून न्यायालयासमोर उभं राहून आरोप मला मान्य नाहीत, असं स्पष्टपणे सांगितलं. याआधी तो कोणत्याही न्यायालयीन सुनावणीत बोललेला नव्हता. आरोप निश्चित झाल्यानंतर आता या खटल्याची पुढील सुनावणी 8 जानेवारी रोजी होणार असून, त्या दिवशी पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारची बाजू मांडली. ‘डिले’ आणि ‘डिरेल’ करण्याचा प्रयत्न: उज्ज्वल निकम सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी आरोपींच्या वकिलांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “आरोपींकडून एकाच कारणांची पुनरावृत्ती करत खटला लांबवण्याचा (Delay) आणि विचलित (Derail) करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. मात्र, न्यायालयाने याला आळा घातला असून आता प्रत्यक्ष पुराव्यांच्या सादरीकरणाला सुरुवात होईल.” संतोष देशमुख यांची हत्या केवळ खंडणी वसुलीत अडथळा ठरत असल्यानेच करण्यात आली, हे तपासातून सिद्ध झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राजकीय भूकंप आणि जनआक्रोश मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय नेत्यांशी जोडले गेल्याने तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारले होते. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, उर्वरित सर्व आरोपी सध्या कोठडीत आहेत. आता या खटल्याची पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार असून, पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला जलदगतीने चालवण्याची मागणी जोर धरत आहे. संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यानंतर घडलेल्या घटना डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ १) ९ डिसेंबर २०२४ ला संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या २) १० डिसेंबर २०२४ ला पोलिसांना संतोष देशमुख यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणातील दोषींना अटक करा अशी मागणी करत कुटुंबीय आणि गावकऱ्यांचं १० डिसेंबरला आंदोलन. ३) ११ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या यांचा गुन्हा दाखल करण्यात आला. ४) १२ डिसेंबर २०२४ ला सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आणि आरोपींच्या आकांवर कारवाईची मागणी केली. त्यांचा रोख सरळ सरळ धनंजय मुंडेंकडे होता. ५) १३ डिसेंबर २०२४ ला बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. तर विष्णू चाटेची हकालपट्टी करण्यात आली. ६) फरार आरोपी विष्णू चाटेला १८ डिसेंबरला अटक ७) १९ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचं जे शवविच्छेदन करण्यात आलं त्याचा अहवाल आला. ज्यात त्यांच्या अंगावर ५६ जखमा होत्या असं नमूद करण्यात आलं होतं. ८) २० डिसेंबरला बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बरगळ यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. ९) २१ डिसेंबरला नवनीत कॉवत यांनी बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. १०) संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. ११) २४ डिसेंबरला मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या खंडणी आणि मारहाण प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग झाला. १२) २८ डिसेंबरला वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदवून अटक व्हावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आमदार खासदारांच्या नेतृत्वात बीडमध्ये भव्यदिव्य मोर्चा निघाला १३) ३० डिसेंबरला याच कारणासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. १४) ३१ डिसेंबरला वाल्मिक कराड दुपारी १२.२० च्या सुमारास पुण्यातील सीआयडीला शरण आला. त्या दिवशी त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं कराडला १४ दिवसांसाठी कोठडीत पाठवलं. १५) ४ जानेवारीला या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाली. १६) ३ मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. १७ ) ४ मार्चला मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.