Sangli News : सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली. (Sangli News) मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना पोलीस अंमलदार विनायक सनदी, संकेत कानडे आणि अभिजित माळकर यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार गोरखनाथ मारुती कदम हा कमरेला पिस्तूल लावून वानलेसवाडी परिसरातील ‘हसनी आश्रम ते कुंभार मळा’ दरम्यान थांबला आहे. (Sangli News) त्यानंतर पोलिसांनी तातडीने परिसरात नाकेबंदी केली. कुंभार मळा येथील नवचैतन्य प्री-प्रायमरी स्कूलजवळ संशयित दिसताच पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि ५०० रुपये किमतीचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. (Sangli News) चौकशीत आरोपीने हे शस्त्र मध्य प्रदेशातील कलघाट येथील ‘सरदार’ नावाच्या व्यक्तीकडून स्वसंरक्षणासाठी घेतल्याची कबुली दिली. गोरखनाथ मारुती कदम (वय ४२, श्रीरामनगर, वानलेसवाडी, सांगली) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्यासह पोलिसांच्या पथकाने ही मोहीम राबवली. (Sangli News) याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला १४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सांगलीतील या कारवाईमुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Sangli News)