Sandeep Deshpande : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले संतोष धुरी यांनी आज ६ जानेवारी २०२६ रोजी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मनसेकडून मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेल्या धुरी यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. या प्रवेशानंतर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) देखील पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. धुरी यांनी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंवर आणि मनसे-उद्धव ठाकरे शिवसेना (यूबीटी) युतीवर गंभीर आरोप केले, ज्यामुळे मनसेतील अंतर्गत असंतोष उघड झाला आहे. संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच मनसे आणि राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, “आमचा पक्ष साहेबांनी त्यांना (उद्धव ठाकरेंना) सरेंडर केला. आम्हाला ज्या जागा दिल्या, त्या दिसायला ५२ आहेत, पण त्यातील ७-८ जागा येतील की नाही याची शंका आहे. ज्या जागा आम्हाला हव्या होत्या त्या दिल्या नाहीत. आता ज्या जागा दिल्या आहेत, तिथे त्यांच्याकडे (शिवसेना यूबीटी) उमेदवार नव्हते, नगरसेवक होते पण त्यांची नावे खराब होती. अशा जागा त्यांनी आम्हाला दिल्या.” धुरी यांनी मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना युतीच्या चर्चेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दोन जागा सोडण्याचे ठरले असताना प्रत्यक्षात फक्त एक जागा मिळाली असा आरोप केला. ते म्हणाले, “मनसेच्या स्थापनेपासून मी राज ठाकरेंसोबत आहे, पण आता पक्षात माझी कदर होत नाही.” धुरी यांनी मनसेतील अंतर्गत घडामोडींवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “मनसे आणि ठाकरे गटातील चर्चेत संदीप देशपांडे यांना डावलण्यात आले. आमचे नेते संदीप देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेत घेतले नाही. आम्ही (मी आणि संदीप देशपांडे) कुठेही दिसलो नाही, कारण मातोश्रीवरून तसाच आदेश होता. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे चर्चेत नसावेत असा आदेश देण्यात आला होता.” धुरी यांनी सांगितले की, त्यांनी संदीप देशपांडे यांना मनसे सोडण्याबाबत सांगितले असता, देशपांडे म्हणाले, “तू तुझा विचार कर, मी काही येत नाही.” मात्र, धुरी यांच्या प्रवेशानंतर देशपांडेही पक्ष सोडणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात या चर्चा सुरू असून, देशपांडे यांनी अद्याप यावर मौन बाळगले आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. संतोष धुरी हे वरळीतील (वार्ड क्रमांक १९४) माजी नगरसेवक असून, त्यांचा स्थानिक पातळीवर चांगला प्रभाव आहे. ते मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांचे निकटवर्तीय आहेत. धुरी यांच्या प्रवेशामुळे भाजपला दक्षिण मुंबईत मजबूती मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे. धुरी यांनी मनसेला सोडचिठ्ठी देताना पक्षाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (यूबीटी) सरेंडर केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “या लोकांनी (शिवसेना यूबीटी) मनसे पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. राज साहेबांनी आमचा पक्ष त्यांना सरेंडर केला.” दरम्यान, संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असल्याचे समजत आहे. ज्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत असा अंदाज आहे. मात्र, सोशल मीडियावर देशपांडे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मनसेतील असंतोष वाढत असून, बीएमसी निवडणुकीत याचा परिणाम दिसू शकतो. धुरी यांनी पक्ष सोडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती, ज्यामुळे हा प्रवेश नियोजित असल्याचे दिसते. या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकीय पटलावर नवे समीकरण निर्माण होत आहेत. मनसे-शिवसेना यूबीटी युतीला धक्का बसला असून, भाजपने मनसेतील असंतुष्ट नेत्यांना आपल्याकडे वळवण्याची रणनीती अवलंबली आहे. त्यामुळे आता संदीप देशपांडे यांचा पुढचा निर्णय काय असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.