sahar shaikh : राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता संपली असून अनेक महापालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतही महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, ठाणे महापालिकेच्या १३१ नगरसेवकांपैकी तब्बल ६९ महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. दरम्यान, ठाण्यातील मुंब्रा परिसरातून निवडून आलेल्या AIMIM च्या तरुण नगरसेविका ‘सहर शेख‘ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘कैसे हराया…’ असे म्हणत त्यांनी केलेले भाषण चर्चेचा विषय ठरले आहे. या भाषणातून त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना डिवचल्याचा आरोप होत आहे. वॉर्ड क्रमांक ३० मधून सहर शेख यांचा विजय : ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ३० (मुंब्रा) मधून AIMIM च्या हिजाब परिधान करणाऱ्या तरुण नेत्या सहर शेख नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर दिलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सहर शेख म्हणतात, “आम्हाला कोणाच्याही वरदहस्ताची गरज नाही. ज्यांना वाटत होतं की आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत, त्यांच्या अहंकाराला आम्ही मातीमोल केलं आहे. आम्ही कोणाच्या बापाच्या मेहेरबानीवर नाही, तर फक्त आणि फक्त अल्लाहवर विश्वास ठेवतो.” पुढे बोलताना त्यांनी पाच वर्षांनंतरच्या निवडणुकांचा उल्लेख करत, “मुंब्रा पूर्णपणे हिरवं करायचं आहे आणि विरोधकांना दारुण पराभव स्वीकारायला भाग पाडायचं आहे,” असे वक्तव्य केले होते. त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे. पोलिसांची नोटीस ‘कैसे हराया…’ या वक्तव्याबरोबरच ‘मुंब्रा हिरवं करू’ या उल्लेखामुळे नवा वाद निर्माण झाला. या भाषणामुळे काही नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार व निवेदन देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावली असून, भविष्यात कोणाच्याही भावना दुखावतील असे वक्तव्य किंवा भाषण करू नये, अशी समज देण्यात आली आहे. पोलिसांकडून ही कारवाई खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हे देखील वाचा… BMC Election : “मुंबईत सत्ताधाऱ्यांच्या सोयीप्रमाणेच लॉटरी” किशोरी पेडणेकर आक्रमक Mallikarjun Kharge : स्वतः चहा करुन लोकांना दिला आहे का?; मल्लिकार्जुन खर्गे यांचा मोदींना सवाल Pune and Pimpri Chinchwad : पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महिला राज; राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता