Rupali Patil Thombre | पुणे महापालिकेतील निवडणुकांच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये एकच गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मशीन बदलल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. इतकेच काय तर ठोंबरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावरील मतमोजणी थांबवली. जवळपास १ तासांहून जास्त काळ मतमोजणी बंद होती. त्यांनी थेट गेटवर चढत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या गोंधळानंतर आता प्रभाग २५ मधील अंतिम निकाल समोर आला असून येथून भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. रुपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव झाला आहे. तर राघवेंद्र मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडीत अशी भाजपच्या विजयी उमेदवारांची नावे आहेत. ठोंबरेंचा भाजपवर गंभीर आरोप दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पार्टीने हे सर्व घडवून आणलं आहे. आमचा या मतमोजणीवरती बहिष्कार आहे. भाजप सोडून सर्व उमेदवारांचा या मतमोजणीवर बहिष्कार आहे, असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.