1) ‘मी कृष्ण, तू राधा’ म्हणत कानाजवळ पुटपुटायचा- Top 10 News नाशिकमध्ये महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत असलेल्या अशोक खरातच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी कसून चौकशी केली असता, महिलांना फसवण्याची ठरलेली पद्धत उघड झालीय. खरात महिलांना “मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील राधा” असे सांगून मानसिक प्रभाव टाकायचा. त्यानंतर पेढा व कडवट द्रव देऊन त्यांना गुंगी आणली आणायचा. पूजा आणि ध्यानाच्या नावाखाली महिलांसोबत आलेल्यांना बाहेर बसवून, एकांत साधून त्यांच्यावर अत्याचार करायचा. दरम्यान, पोलिसांच्या हाती 100 हून अधिक महिलांशी संबंधित पुरावे लागल्याची माहिती असून, गेल्या 2-3 वर्षांपासून हा प्रकार सुरू असून पुढील तपास सुरू आहे. २) पुण्यात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ- Top 10 News पुण्यात पेट्रोल दरवाढीचा मोठा फटका बसलाय. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ केलीय. आज, 20 मार्च पासून स्पीड प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.09 रुपयांनी वाढ झालीय. यापूर्वी 111.68 रुपये असलेला दर आता 113.77 रुपये प्रति लिटर झालाय. दरम्यान, मध्यपूर्वेतील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे जागतिक बाजारात अस्थिरता वाढू शकते. तज्ज्ञांच्या मते, ही दरवाढ पुढेही कायम राहण्याची शक्यता असून सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा परिणाम होणार आहे. ३) अशोक खरात अतिशय घाणेरडा- Top 10 News नाशिकमधील अशोक खरात अत्याचार प्रकरणावरून राज्यात मोठा वाद निर्माण झालाय. या प्रकरणात पोलिसांनी ज्योतिषी अशोक खरातला अटक केली असून, त्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी कठोर भूमिका घेतलीय. “भोंदूबाबांचे प्रकार घाणेरडे असून अशोक खरातवर सक्त कारवाई झाली पाहिजे. त्याच्यासोबत असणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे,” असं त्यांनी म्हटलंय. ४) तर बारामतीत आमच्याकडे अनेक पर्याय- बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट इशारा देत म्हटलं की, जर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही निवडणूक लढवणार नसेल, तर त्यांनी तशी भूमिका जाहीर करावी, अन्यथा काँग्रेसकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच बारामती ही पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) लढवत आलेली जागा आहे. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. अंतिम निर्णय मात्र महाविकास आघाडी एकत्रितपणे घेईल, असंही त्यांनी नमूद केलंय. ५) इराणला मोठा धक्का- इराण आणि इस्रायल तसेच अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान इराणला मोठा धक्का बसलाय. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे मुख्य प्रवक्ते अली मोहम्मद नाईनी हे हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आलीय. नाईनी हे IRGC च्या मानसिक युद्ध आणि जनसंपर्क यंत्रणेतील महत्त्वाचे चेहरे मानले जात होते. त्यांच्या मंजुरीनंतरच संघटनेची अधिकृत निवेदने आणि प्रचार प्रसिद्ध होत असे. मृत्यूपूर्वी त्यांनी एका मुलाखतीत अमेरिकेला आव्हान देत, “आम्ही इस्रायल-अमेरिकेसोबत सहा महिने लढू शकतो,” असं वक्तव्य केल होतं. तसेच इराणकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. या घटनेमुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ६) ‘बालेन शाह’ २७ मार्चला पंतप्रधानपदाची शपथ घेणार- नेपाळच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (RSP) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर तरुण नेते ‘बालेन शाह’ २७ मार्च रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आलीय. ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीत RSP ने तब्बल १८२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. या निकालामुळे पारंपरिक पक्षांना मोठा धक्का बसलाय. निवडणुकीपूर्वीच ‘बालेन शाह’ यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष रवि लामिछाने आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली. या निकालामुळे नेपाळमध्ये नव्या नेतृत्वाची नवी सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे. ७) ममता बॅनर्जी सरकारचा मोठा निर्णय- पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकारने नागरी आणि ग्राम पोलीस स्वयंसेवकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. सरकारने 2025-26 आर्थिक वर्षासाठी तदर्थ बोनस वाढवून 7,400 रुपये केलाय. यापूर्वी हा बोनस 6,800 रुपये होता, म्हणजेच 600 रुपयांची वाढ करण्यात आलीय. राज्य सचिवालय ‘नबन्ना’ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा वाढीव बोनस राज्य पोलीस, कोलकाता पोलीस आणि ग्राम पोलीस स्वयंसेवकांना लागू होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा मासिक पगार 31 मार्च 2026 पर्यंत 46,000 रुपयांपर्यंत आहे आणि जे उत्पादकता-आधारित बोनस योजनेत समाविष्ट नाहीत, ते या बोनससाठी पात्र असतील. ८) Zomato ची प्लॅटफॉर्म फी महागली- फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato वरून जेवण ऑर्डर करणे आता महाग झालेय. कंपनीने प्लॅटफॉर्म फीमध्ये 19 टक्के वाढ करत ती 12.50 वरून ₹14.90 केलीय. म्हणजेच प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांना 2.40 रुपये अधिक मोजावे लागणार असून GST लागू झाल्यानंतर ही रक्कम आणखी वाढणारय. ही प्लॅटफॉर्म फी GST, रेस्टॉरंट चार्ज आणि डिलिव्हरी फीपेक्षा वेगळी असते. दरम्यान, Zomato दररोज सुमारे 20 ते 25 लाख ऑर्डर्स डिलिव्हर करते. स्पर्धक स्वीगी सध्या करांसह जवळपास 14.99 रुपये प्लॅटफॉर्म फी आकारत आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढण्याची शक्यताय. विशेष म्हणजे, 2023 मध्ये केवळ 2 रुपयांपासून सुरू झालेली ही फी टप्प्याटप्प्याने वाढत आता 14.90 रुपयापर्यंत पोहोचलीय. ०९) ‘धुरंधर २’नंतर यामी गौतमचा नवा धमाका- बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. ‘धुरंधर २’मधील कॅमिओनंतर आता ती ‘नई नवेली’ या नव्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हॉरर आणि कॉमेडीचा अनोखा मिलाफ असणार असून OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘नई नवेली’ हा चित्रपट आनंद एल राय यांच्या बॅनरखाली तयार होत असून दिग्दर्शन बालाजी मोहन करत आहेत. चित्रपटात भारतीय पौराणिक कथांचा हलक्याफुलक्या शैलीत समावेश करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली असून सध्या प्री-प्रोडक्शन सुरू आहे. लवकरच शूटिंगला सुरुवात होणार असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढलीय. १०) IPL 2026: ७ दिग्गज वेगवान गोलंदाज बाहेर- आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच ७ प्रमुख वेगवान गोलंदाजांनी माघार घेतल्याने खळबळ उडालीय. यात हर्षित राणा, सॅम कुरन, नॅथन एलिस आणि जॅक एडवर्ड्स हे दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडलेत. दुसरीकडे, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकतील. तर न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन कौटुंबिक कारणामुळे सुरुवातीच्या टप्प्यात उपलब्ध नसेल. यातील ६ खेळाडू केवळ दुखापतीमुळे बाहेर पडले असून, संघांना आता तातडीने बदली खेळाडू शोधावे लागणार आहेत.