Republic Day 2026: देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी दिल्लीतील कर्तव्यपथावर भारतीय लष्कराच्या बदलत्या आणि आधुनिक स्वरूपाचे दर्शन घडले. पारंपारिक युद्धाची जागा आता तंत्रज्ञानाने घेतली असून, ड्रोन, रोबोटिक सिस्टम आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या प्रदर्शनातून भारताने आपली वाढती लष्करी ताकद जगाला दाखवून दिली. ‘ऑपरेशन सिंधूर’ मधील यशानंतर प्रथमच भारतीय लष्कर पूर्णपणे आधुनिक युद्ध पेहरावात आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह संचलनात सहभागी झाले होते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले युरोपीय परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन हे होते. Republic Day parade ड्रोन आणि रोबोटिक्स: लष्कराचे नवे ‘ब्रह्मास्त्र’ – युक्रेन युद्धातील अनुभवातून धडा घेत भारतीय लष्कराने आपल्या ताफ्यात ड्रोन तंत्रज्ञानाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. संचलनात अर्जुन आणि टी-९० यांसारख्या मुख्य रणगाड्यांवर ‘अँटी-ड्रोन’ जाळीदार कवच पाहायला मिळाले. शक्तीबान आणि दिव्यास्त्र: हे हाय-मोबिलिटी वाहनांवर आधारित ड्रोन सिस्टम शत्रूवर नजर ठेवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. लोइटरिंग मुनिशन्स: हवेत घिरट्या घालून शत्रूवर अचूक हल्ला करणाऱ्या या उपकरणांनी ‘ऑपरेशन सिंधूर’मध्ये पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली होती. रोबोटिक म्युल्स: दुर्गम भागात सामान वाहून नेण्यासाठी आणि मानवी जीव वाचवण्यासाठी अनमॅन्ड ग्राउंड व्हेइकल्स (UGV) आणि रोबोटिक म्युल्सचे प्रदर्शन करण्यात आले. हायपरसोनिक क्षेपणास्त्र आणि सूर्यास्त्रचा दरारा – भारताने लांब पल्ल्याच्या मारक क्षमतेत मोठी झेप घेतली असून, डीआरडीओने विकसित केलेल्या लॉन्ग रेंज हायपरसोनिक क्षेपणास्त्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. १५०० किमी पेक्षा जास्त पल्ला असलेल्या या क्षेपणास्त्रासह भारत आता अमेरिका, रशिया आणि चीनच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. सूर्यास्त्र रॉकेट लॉन्चर: १५० आणि ३०० किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या या प्रणालीमुळे भारताची तोफखाना शक्ती अनेक पटीने वाढली आहे. हेही वाचा – IAF Officer Akshita Dhankhar: राष्ट्रपतींसोबत तिरंगा फडकवणारी ही महिला अधिकारी कोण? लेफ्टनंट अक्षिता धनखर यांची संपूर्ण कहाणी जाणून घ्या… युद्धनीतीत मोठा बदल: ३० मिनिटांचे काम ३ मिनिटांत- या परेडमधून भारतीय लष्कराच्या ‘इंटीग्रेटेड’ स्वरूपाचे दर्शन घडले. पायदळ, नौदल आणि वायुसेनेच्या एकत्रित ‘ऑपरेशनल सेंटर’चे मॉडेल सादर करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शत्रूचा शोध घेण्यापासून त्यावर हल्ला करण्यापर्यंतचा वेळ, जो पूर्वी ३० मिनिटे लागायचा, तो आता केवळ ३ मिनिटांवर आला आहे. नव्या दमाचे ‘भैरव’ लाईट कमांडो आणि ऑल-टेरेन व्हेइकल्सनी भारतीय लष्कर कोणत्याही भौगोलिक परिस्थितीत लढण्यास सज्ज असल्याचे सिद्ध केले.