जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका? राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती समोर येतीय. येत्या 15 ते 20 डिसेंबरदरम्यान आयोगाकडून आगामी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो. त्यात जिल्हा परिषद निवडणुकांआधी 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक जाहीर होऊ शकते असं सांगण्यात येतंय. राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेलीय. त्यामुळे आरक्षणाच्या या घोळामुळे निवडणूक आयोगाला महापालिका निवडणूक आधी घेणं सोयीस्कर वाटत असल्याचं सांगण्यात येतंय. यासंदर्भात आज राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावलीय. या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे. ============================ बीडमध्येदीपक देशमुखांचा नगरपरिषद कर्मचाऱ्यावर आरोप बीडच्या परळीमध्ये स्ट्राँग रूम असलेल्या नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते दीपक देशमुखआणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले. काल रात्री दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्राँगची पाहणी करण्यासाठी गेले असताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा आणि शिवीगाळ केल्याचा आरोप देशमुख यांनी कर्मचाऱ्यावर केला. यावेळी नगरपरिषदेसमोर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले होते त्यामुळे इथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. ====================== आमदार रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आमदार रोहित पवार यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण त्यांना नाशिकच्या न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिलेत. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हे आदेश दिलेत. रोहित पवार यांनी कोकाटे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला होता. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये विधिमंडळ अधिवेशनात माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा रोहित पवारांनी आरोप केला होता. दरम्यान , या प्रकरणाची न्यायालयाने पोलिसांनी चौकशी करण्याचे दिले होते आदेश. त्यानंतर आता येत्या 9 तारखेला रोहित पवार यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. ==================== जैन समाजाचा 7 डिसेंबरला मोर्चा मुंबईत जैन समाजाकडून 7 डिसेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘जीव दया आणि कबुतर बचाव’ या अभियानाची सुरुवात जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे. हा मोर्चा कुलाबा जैन मंदिरातून सुरू होऊन लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअर परळ या मार्गे दादर कबुतरखाना जैन मंदिरासह इतर प्रमुख जैन मंदिरांपर्यंत जाणार आहे. यात्रेदरम्यान जैन समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रवचन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. अभियानाला व्यापक पाठिंबा देण्याचं आवाहनही केलं जाईल. ‘जीव दया आणि कबुतर बचाव’ आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी निलेशचंद्रजी महाराज दादरमध्ये पुन्हा अनशन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जातीय. ========================= रॅपीडो, उबेर सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रॅपीडो, उबेर सारख्या ॲप आधारित कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले आहेत. शासनाने नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर केले असताना अनेक कंपन्यांनी नियम न पाळता सेवा सुरू केल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक ॲप-आधारित कंपन्या चालकांना कोणतेही प्रशिक्षण न देता खासगी बाईकद्वारे प्रवासी सेवा देत आहेत. ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. अलीकडेच अशाच एका अवैध बाईक टॅक्सीवरून जाताना प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर मिळालेल्या तक्रारींनंतर ही कठोर कारवाई करण्यात आली. ====================== तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य प्रवाशांना रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर तात्काळ तिकीट बबुकिंग करायचं असल्यास ओटीपी वेरिफिकेशन करावं लागणार आहे. रेल्वे मंत्रालयानं तात्काळ तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवास करताना तिकिटांचं आरक्षण करावं लागतं. अनेकदा रेल्वेचं नियमित आरक्षण पूर्णपणे बुक झालेलं असल्यास तात्काळ तिकीट बुकिंगचा पर्याय असतो. मात्र, काही जण सॉफ्टवेअरचा वापर करुन तात्काळ तिकीट बुकिंग करत असल्यानं काही सेकंदांमध्ये तात्काळ तिकीट बुकिंग संपल्यानं प्रवाशांना तिकीट मिळत नव्हती. पायलट प्रोजेक्ट म्हणून तात्काळ तिकीट बुकिंगमधील ओटीपी बेस्ड यंत्रणा 17 नोव्हेंबरला राबवण्यात आली होती. सुरुवातीला ही पद्धत काही ट्रेन्सच्या बुकिंगसाठी वापरण्यात आली. त्यानंतर त्याची संख्या वाढवून 52 करण्यात आली होती. येत्या काही दिवसांमध्ये ही यंत्रणा सर्व ट्रेन साठी लागू करण्यात येईल असं सागण्यात आलंय. ======================== व्लादिमीर पुतीन यांचा दोन दिवसांचा भारत दौरा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज भारत दौऱ्यावर येत आहेत. पुतीन त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी संध्याकाळी ६ वाजता दिल्लीत पोहोचतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सन्मानार्थ खास डिनरची व्यवस्था केली आहे. पुतिन यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारत-रशिया धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी मजबूत करणे आहे. यानंतर पुतीन त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजता त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल. याशिवाय, पुतीन महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजघाटला देखील भेट देतील. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात हैदराबाद हाऊस येथे वार्षिक शिखर बैठक आणि भारत मंडपम येथे भारत-रशिया मंचाची बैठक होईल. यानंतर पुतिन रशियाला रवाना होतील. तत्पुर्वी पुतीन यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, शिखर बैठकांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवणे, बाह्य दबावांपासून द्विपक्षीय व्यापाराचे संरक्षण करणे आणि लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्समध्ये संभाव्य सहकार्य यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची अपेक्षा आहे. ============================ तालिबानची पाकिस्तानला पुन्हा धमकी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने पाकिस्तानला स्पष्ट केले आहे की काबुल आता कोणत्याही बाह्य दबावाखाली आपले परराष्ट्र धोरण राबवणार नाही. भारताशी वाढत्या जवळीकतेबद्दल पाकिस्तानच्या अस्वस्थतेला तालिबानने स्पष्टीकरण दिलंय. तालिबानने अफगाणिस्तान कोणत्याही शेजारील देशाच्या पसंतीनुसार नाही तर स्वतःच्या हितसंबंधांवर आधारित संबंध निर्माण करतो असं म्हटलंय. मुत्ताकी यांनी, पाकिस्तानला अफगाणिस्तानने भारताशी आपले संबंध मजबूत करण्यास कोणतीही अडचण नसावी. जर पाकिस्तान स्वतः भारताशी राजनैतिक संपर्क राखू शकत असेल तर अफगाणिस्तानलाही असे करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मुत्ताकी यांनी,पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा बराच काळ प्रयत्न केला आहे, परंतु हा काळ आता संपलाय. ========================= आता अंतिम सामन्यात भारत- दक्षिण आफ्रिका आमनेसामने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलीय. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलाय, ज्यामुळे गुण १-१ अशी बरोबरी झालीय. आता तिसऱ्या आणि शेवटचा सामना रंगतदार होणार आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना ६ डिसेंबर २०२५ रोजी खेळला जाईल. विशाखापट्टणम या सामन्याचे आयोजन करण्यात आलंय. हा दिवस/रात्र सामना आहे, जो दुपारी १:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये काही धोरणात्मक बदल देखील दिसून येत आहेत. दरम्यान, या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 4 विकेटनं विजय मिळवलाय. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी केलीय. ================= ‘धुरंधर’ने अॅडव्हान्स बुकिंगद्वारे कोट्यवधींची कमाई गेल्या कित्येक दिवसांपासून रणवीर सिंहच्या फिल्म्सची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. रणवीर सिंहचा ‘धुरंधर’ हा सिनेमा 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या त्याची अॅडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगद्वारे या चित्रपटानं आधीच कोट्यवधी रुपये कमावले आहेत. ‘धुरंधर’मध्ये अनेक प्रमुख कलाकार आहेत, ज्यामुळे बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना आणि आर. माधवन हे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जातंय आणि यामुळे वादही निर्माण झाला आहे. त्यामुळं या चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता शिगेला पोहचलीय.