Today’s Top 10 News | आजच्या टॉप १० बातम्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आलीय. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट एकत्र निवडणुक लढणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपा वेगवेगळे निवडणूक लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीची ताकद समसमान आहे. अशात, कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी होऊ नये, यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीने वेगळी रणनीती आखलीय. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत वेगळं लढत विरोधकांना बाजूला सारलं जाणार आहे. नागपुरात भाजपाची ताकद अधिक असली, तरी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला देखील सोबत घेतलं जाणार आहे. नवी मुंबईसंदर्भात अद्यापही निर्णय नाही, मात्र, भाजपा-सेना एकत्र येण्यासंदर्भात हालचाली सुरु आहे. दिल्लीत शरद पवारांना सर्वपक्षीय नेत्यांकडून शुभेच्छा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमत्त राजधानी दिल्लीत काल दिग्गज एकवटले होते. विशेष म्हणजे अजित पवार, पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी पवारांच्या निवासस्थानी हजेरी लावली. त्याचसोबत उद्योगपती गौतम अदानी तसंच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधींसह अनेक खास पाहुणे पवारांच्या निवासस्थानी आले होते. 12 डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असून काल दिल्लीत वाढदिवसानिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. भाजप, ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, काँग्रेसह इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. 12 डिसेंबर रोजी शरद पवारांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. मात्र त्या दिवशी शरद पवार हे मुंबईत येणार असल्याची शक्यता आहे. म्हणून दिल्लीत खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम! उत्तरेकडील शीत वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडीची लाट दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई, पुण्यात देखील नागरिक थंडीने कुडकुडले आहेत. राज्यात बुधवारी परभणी येथे नीचांकी ५.७ अंश सेल्सिअस, तर धुळे आणि जेऊर येथे प्रत्येकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड मध्ये ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर, जळगाव येथे ८ अंशांपेक्षा कमी, तर नाशिक, पुणे, यवतमाळ, नागपूर, गोंदिया येथे ९ अंशांपेक्षा कमी आणि मालेगाव, वर्धा येथे १० अंशांपेक्षा तापमान नोंदले गेल्याने हुडहुडी कायम आहे. भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी अडचणी वाढल्या पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा न्यायालयानं तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला आहे. पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी अन् जावयाचे नाव आले होते. या प्रकरणामुळे खडसे यांना मंत्रीपदही सोडावे लागले होते. या प्रकरणात खडसे यांनी मुंबईतील कोर्टात दोषमुक्त करण्यासाठी अर्ज केला होता. पण कोर्टाकडून हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नेत्यांच्या कॅशबॉम्बनंतर आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल राज्यात सध्या नेतेमंडळींच्या कॅशबॉम्बवरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. आमदार महेंद्र दळवी यांच्यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांचाही एक व्हिडिओ समोर आलाय. भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलांसह एक व्हिडीओ शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी समोर आणला. एकीकडे नेतेमंडळीच्या पैशांचे व्हिडिओ व्हायरल होत असतानाचा आता एका पोलीस अधिकाऱ्याचा नोटांच्या बंडलासह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळं राज्यात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय. दरम्यान , या प्रकरणी बोलताना,” एका जमीन व्यवहारात केवळ साक्षीदार म्हणून आपण उपस्थित राहिल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. राहुल गांधींचं ओपन चॅलेंज,अमित शहा भडकले लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भरसभागृहात केंद्रीय गृहमंत्र्यांना चर्चेसाठी ओपन चॅलेंज दिलं. त्यावेळी मतचोरीच्या आरोपांवर गृहमंत्री अमित शहा उत्तर देत होते. राहुल गांधींनी चॅलेंज देताच केंद्रीय गृहमंत्री संतापले.”सर्वप्रथम, मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी गेल्या ३० वर्षांपासून विधानसभा आणि संसदेत निवडून आलोय. संसदीय व्यवस्थेचा व्यापक अनुभव आहे.” त्यावर राहुल गांधी म्हणाले, आधी माझ्या मुद्द्याचे उत्तर द्यावे, मला ऐकायचे आहे.” राहुल गांधींच्या अशा मध्येच बोलण्यावर अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. संतापत त्यांनी संसद तुमच्या इच्छेनुसार चालणार नाही. मी कोणत्या क्रमाने बोलेन ते मी ठरवेन.” ते जे काही बोलतील त्याला मी उत्तर देईन, पण ते माझ्या भाषणाचा क्रम ठरवू शकत नाही, ते मी ठरवेन. राहुल गांधी उभे राहिले आणि म्हणाले, “ही एक बचावात्मक प्रतिक्रिया आहे, चिंताग्रस्त आणि घाबरलेली उत्तर आहे. ही खरी प्रतिक्रिया नाही.” नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? चार नवे लेबर कोड लागू झाल्यानंतर नोकरदारांसर्भातील अनेक नियमांमध्ये बदल झालाय. काही नियमांबाबत लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत. त्यापैकीच एक म्हणजे टेक होम सॅलरी वाढणार की कमी होणार? केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयानं यावर स्पष्टीकरण दिलंय. देशात चार लेबर कोड 21 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आलेत. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या मते नव लेबर कोड लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीत कसलाही फरक पडत नाही. जर पीएफ कपातीची वैधानिक मर्यादा 15000 रुपये ठेवली तर, असं श्रम आणि रोजगार मंत्रालयानं म्हटलं. मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे हे समाजवून सांगितलय. ज्यामुळं वेतनश्रेणीत बदल झाले तरी टेक होम सॅलरीवर परिणाम होणार नाही. अमेरिकेकडून गोल्ड कार्ड व्हिसा लाँच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांपासून निर्णयांचा धडाका लावलाय. त्यातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठं पाऊल उचललंय. ट्रम्प यांनी एक नवीन व्हिसा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलीय.त्यानुसार ’ट्रम्प गोल्ड कार्ड’ हा व्हिसा त्यांनी लाँच केला आहे. संदर्भातील काल घोषणा करण्यात आली. ‘ट्रम्प गोल्ड कार्ड’च्या माध्यमातून १० लाख डॉलर्समध्ये आता थेट अमेरिकन नागरिकत्व मिळणार आहे. या गोल्ड कार्ड नागरिकत्वासाठी लोकांना अर्ज करता येणार असून अर्ज स्वीकारण्यासाठी वेबसाइट देखील सक्रिय करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये दिली आहे. श्रीलंकेविरुद्ध रंगणार पाच सामन्यांची टी-20 मालिका भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यात टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. भारतात श्रीलंकेविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका रंगेल. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करेल, तर स्मृती मानधना उपकर्णधार असेल. 2025 च्या एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर भारताची ही पहिलीच मालिका असेल. भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमधील पाच सामन्यांची टी-20 मालिका 21 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 30 डिसेंबरपर्यंत चालेल. प्राजक्ता माळी स्वतःचाच ‘तो’ फोटो पाहून चिडली मराठी मनोरंजन विश्वातली ‘फुलवंती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळीनं नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केलेली. ज्यामध्ये तिनं स्वतःच्याच फोटोवरुन तिच्याच फॅन पेजवर राग व्यक्त केलेला. प्राजक्ता माळीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिलंय की, हा फोटो दिसायला कितीही सुंदर असला तरी मी या फोटोचं अजिबातच कौतुक करणार नाही. मी AI नं तयार केलेल्या फोटो आणि व्हिडीओंना अजिबात प्रोत्साहन देणार नाही. मी माझ्या फॅन पेजेसना तसेच इतरांनाही विनंती करते की, हे असं बनवणं थांबवा… सोबतच प्राजक्तानं तिचा AI द्वारे तयार केलेला फोटो शेअर केला आहे.