विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु होतंय. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवादी संघटना भारतात घातपात घडवू शकतात असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानं शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय, रेशीमबागेसह सर्वच महत्त्वाची धार्मिक स्थळं आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलीय. शहरात राज्य राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या, होमगार्डसह दहा हजार पोलिस तैनात करण्यात आलेत.याशिवाय एआयच्या मदतीने शहरातील प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्वच महत्त्वाच्या स्थळांची बॉम्बशोधक नाशक पथकाद्वारे कसून तपासणी करण्यात येत आहे. हे अधिवेशन यंदा केवळ सात दिवसच असणार आहे. त्यामुळं विरोधक चांगलेच आक्रमक होणार असल्याचंही सांगण्यात येतंय. ==================== धनंजय मुंडेंची चौकशी करा, नाहीतर भारी पडेल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी धनंजय मुंडे यांनी माझी अडीच कोटींची सुपारी दिली होती. याबाबत तीन आरोपींनी कबुली दिली आहे. धनंजय मुंडे यांना चौकशीला बोलवा. नाही बोलवले तर भारी पडेल तुम्हाला असा राज्य सरकारला इशारा दिलाय. त्यासोबतच तुम्हाला सत्तेचा माज आहे त्यामुळे मुंडेंची चौकशी करत नाहीत. सत्ता गेल्यावर सोडणार नाही. तुमची सत्ता मराठा घालवणार असल्याची टीका देखील जरांगे यांनी केलीय. ==================== तुकाराम मुंढे यांना निलंबित करा राज्यातील ख्यातनाम आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचं सांगण्यात येतंय. तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची “स्मार्ट सिटी प्रकल्प”चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार नियमबाह्य पद्धतीने आपल्याकडे घेतला होता, असा आरोप भाजपाचा आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी भाजपा आमदार विधिमंडळ अधिवेशनात करणार आहेत. ================== विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसचा नवा प्रस्ताव विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या प्रश्नावर काँग्रेसने पुन्हा भूमिका कठोर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिषद सभापती राम शिंदे यांच्याकडे नव्याने औपचारिक प्रस्ताव देण्याचे ठरवले आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान सतेज पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तोच प्रस्ताव पुन्हा एकदा नव्याने मांडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार अभिजित वंजारी यांनी दिली. विधान परिषदेतील संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले असून, विरोधी पक्षनेतेशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचा ठाम इशाराही सरकारला दिला. ================== महाराष्ट्र गारठला! पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार राज्यात किमान तापमानात पन्हा एकदा घट होत असल्यानं थंडीत वाढ झालीय. मागील काही दिवस राज्यातून थंडीने ब्रेक घेतला होता. पण आता पुन्हा एकदा पारा घसरलाय. त्यामुळे हुडहुडी भरण्यास सुरूवात झालीय. राज्यात सर्वाधिक थंडी विदर्भात आहे. वर्धा, भंडारा आणि गोंदियात पुढील काही दिवस थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं पूर्व विदर्भासाठी यलो अलर्ट जारी केलाय. पुढील काही दिवस उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यात कडाक्याची थंडी पडली असून आजपासून पारा 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ही स्थिती पुढील आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय. ======================= मुख्यमंत्री होण्यासाठी “५०० कोटींची सुटकेस” लागते काँग्रेस नेत्या आणि माजी आमदार नवज्योत कौर सिद्धू यांच्या एका विधानामूळ पंजाबच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय. पंजाबमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी “५०० कोटी रुपयांची सुटकेस” लागते असा दावा त्यांनी केलाय. या विधानामुळे विरोधकांना तर संधी मिळालीच, शिवाय काँग्रेस पक्षातही गोंधळ निर्माण झालाय. नवज्योत कौर सिद्धू यांनी काँग्रेसने अधिकृतपणे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले तरच त्यांचे पती नवज्योत सिंग सिद्धू सक्रिय राजकारणात परततील.असं म्हटलं, त्यासोबतच त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. कारण जो कोणी ५०० कोटी रुपयांची सुटकेस देतो तो मुख्यमंत्री होतो. असा आरोप त्यांनी केलाय. ========================== भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात राजकीय प्रतिस्पर्धी थिरकल्या भाजप खासदार कंगना राणौत, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार आणि उद्योगपती नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात जोरदार ठुमके लगावलेत. त्यांनी एकत्रित “ओम शांती ओम” चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यावर “दीवानगी दीवानगी” धमाकेदार डान्स केला. संसदेत एकमेकांना भिडणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांचा एकत्र नाचण्याचा व्हिडिओ पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे हे नेते लग्नासारख्या खासगी कार्यक्रमात इतक्या उघडपणे एकत्र दिसले याचे लोकांना आश्चर्य वाटते. ===================== ट्रम्प यांची झेलेन्स्की यांच्यावर नाराजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशिया आणि युक्रेनवर नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. ट्रम्प जगभरात आठ युद्धे थांबवल्याचा दावा करतायत, परंतु रशिया आणि युक्रेनमधील समेट शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावर नाराजी व्यक्त केली. याविषयी त्यांनी झेलेन्स्की यांनी त्यांचा प्रस्तावही वाचला नाही.असं म्हटलंय. “मी आठ युद्धे थांबवली. मला वाटलं होतं की रशिया-युक्रेन युद्ध थांबवणे सोपे होईल, परंतु ते सोपे केले जात नाही. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी अद्याप हा प्रस्ताव वाचला नाही याबद्दल मी थोडा निराश आहे.” असं ट्रम्प म्हणालेत. =============== तर त्यांनीही आमच्या कामात नाक खुपसू नये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडिया आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली. या टीकेला आता गौतम गंभीरने उत्तर दिलंय. त्याने याविषयी बोलताना “लोक आणि मीडिया हे विसरतात की पहिल्या कसोटीमध्ये आमचा कर्णधार आणि आमचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज दोन्ही डावांत मैदानात उतरू शकला नाही. लोकांनी अशीही वक्तव्ये केली ज्यांचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही. एका आयपीएल टीमच्या मालकाने तर स्प्लिट कोचिंगबद्दल भाष्य केले. लोकांनी स्वतःच काम बघितलं पाहिजे. आम्ही त्यांच्या कामात बोलत नाही, तर त्यांनीही आमच्या कामात नाक खुपसू नये.” असं म्हटलं. गौतम गंभीरच्या या वक्तव्याचा स्पष्ट निशाणा दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पार्थ जिंदल यांच्यावर होता. ============== बिग बॉस-19 चा गौरव खन्ना विजेता सर्वांचं लक्ष लागून असलेल्या बिग बॉस शोच्या 19 व्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना ठरला आहे. तर फरहाना भट्ट हा उपविजेता ठरला. मराठमोळा प्रणीत मोरे हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. गौरव खन्नाने 50 लाखांच्या बक्षिसासह बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली. बिग बॉस 19 शो सलमान खानने होस्ट केला होता. चाहत्यांनी बिग बॉस 19 शोला भरभरून प्रतिसाद दिला. टीआरपी रेटिंगमध्ये हा कार्यक्रम टॉप 10 मध्ये होता. या शोमध्ये भांडणे आणि मैत्रीचे अनेक रुप पाहायला मिळाले. मराठमोळा प्रणीत मोरे हा टॉप 2 मध्ये स्थान मिळवू शकला नाही. फक्त गौरव खन्ना आणि फरहाना भट्ट टॉप 2 मध्ये राहिले. तान्या मित्तल, फरहाना भट्ट, गौरव खन्ना आणि प्रणीत मोरे यांनी टॉप 4 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले होते.