19 डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप! येत्या 19 डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. पंतप्रधान होणारी व्यक्ती मराठी माणूस असून ती भाजपचीच असू शकते, असंही त्यांनी म्हटलंय. पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना जगात घडणाऱ्या घडामोडींचे संदर्भ दिलेत. अमेरिकेतील नव्या कायद्याचाही दाखला चव्हाणांनी दिला. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार असल्याचा दावा चव्हाणांनी केलाय. ================ इंदुरीकर महाराजांचे कीर्तन बंद प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे पुण्यात सुरू असलेले कीर्तन काही वेळेसाठी बंद करण्यात आल्याची घटना घडलीय. हांडेवाडी परिसरात सुरू असलेले कीर्तन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर थांबवण्यात आलं. रस्त्यावर सुरू असलेल्या कीर्तनामुळे वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिसांनी ही भूमिका घेतली. नंतर जमलेले लोक एका बाजूला बसले आणि दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू झाली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पुन्हा सुरू झाले. हांडेवाडी परिसरात निवृत्ती महाराजांचे कीर्तन सुरू होतं. हे कीर्तन ऐकण्यासाठी लोक रस्त्यावर बसले होते. मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. ================== देवेंद्र फडणवीसांनी लोकशाहीलाच फाशी दिली सध्या नागपूरमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. देवेंद्र फडणवीस यांना अधर्मी म्हणले पाहिजे तसेच निंदकाचे घर असावे शेजारी हा संदेश सुद्धा त्यांना मान्य नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी जल्लाद म्हणलो होतो. देवेंद्र फडणवीस हे लोकशाहीलाच फाशी देत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन कसे झाले असा प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता त्यांनी राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा शब्दात त्यांनी अधिवेशनाचे वर्णन केले. ================ राज्यात थंडीचा कडाका वाढला राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. राज्यातील इतर जिल्ह्यांतही थंडी कायम राहणार आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर , पुणे आणि सोलापूर या सात जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा हवामान विभागाने इशारा दिलाय. पश्चिम महाराष्ट्रात गारठा कायम आहे. हवामान विभागाने पुणे आणि सोलापूरला थंडीचा लाटेचा इशारा दिलाय. पुण्यात किमान तापमान ९ तर कमाल २८ अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. कोकणातही थंडी वाढली असून अनेक जिल्ह्यांत गारठा कायम आहे, रविवारी मुंबईतील किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहील. तर आकाश निरभ्र राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ======================== प्राध्यापक भरतीचा गुंता अखेर सुटला राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयातील रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा गुंता अखेर सुटलाय. राज्यपाल आणि कुलपतींनी यापूर्वीच्या ‘८०+२०’च्या गुणाच्या सूत्राऐवजी ‘६०+४०’ गुणांच्या नव्या सूत्राला मान्यता दिलीय. त्यामुळे राज्यात रखडलेल्या प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा झालाय. याविषयीची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत दिलीय. महाविद्यालयस्तरावर वरिष्ठ प्राध्यापक पदांच्या पाच हजार ११२ जागांना वित्त विभागानं मान्यता दिल्यानं राज्यात मोठी भरती होणार आहे. =============== राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरला ! दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत प्रदूषित झालीय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाव्यानुसार, परिसरातील वायू गुणवत्ता निर्देशांक ४९१ असून, त्याचे वर्गीकरण ‘अत्यंत गंभीर’ असे करण्यात आले आहे. ज्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. वाढत्या प्रदूषणाचा विशेषतः फुफ्फुसांच्या आजार असलेल्यांना त्रास होत आहे. दिल्लीतील ही विषारी हवा श्वसनाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरत आहे, ज्यामुळे त्यांना श्वास घेणेही कठीण होतय. एम्सच्या दाव्यानुसार,परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की क्लिनिकच्या बाहेर रुग्णांची संख्या सतत वाढतीय. ======================= हवाई दलाच्या निवृत्त कर्मचाऱ्याला अटक भारतीय हवाई दलाच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याला अटक करण्यात आलीय. त्याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संबंध प्रस्थापित करणे आणि त्यांना संरक्षण क्षेत्राविषयी कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपावरून आसाममधील तेझपूरमधून ताब्यात घेण्यात आलंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी कुलेंद्र शर्मा हा ज्युनियर वॉरंट ऑफिसर म्हणून २००२ साली भारतीय हवाई दलातून निवृत्त झालाय. त्याला भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी कृत्ये करणे, भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, गुन्हेगारी कट रचणे, गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे अशा आरोपांखाली अटक करण्यात आलीय. =================== डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात 19 राज्यं एकवटली अमेरिकेमधील 19 राज्यांनी देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा फी वाढीच्या निर्णयाला विरोध केला आहे. 19 राज्यांनी H-1B व्हिसा फी वाढी विरोधात कोर्टात धाव खेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी H-1B व्हिसाची फी 1000 अमेरिकन डॉलर्सवरुन 1 लाख अमेरिकन डॉलर्स केली होती. 19 राज्यांनी ट्रम्प यांनी केलेली H-1B व्हिसा फी वाढ बेकायदेशीर असल्याचा दावा केला. यामुळं ज्या कंपन्या कुशल विदेशी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत त्यांच्यावर बंधनं येत असल्याचा दावा केला. द इकोनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार कॅलिफोर्निया आणि मॅसेच्युसेट्स या राज्यांनी शुक्रवारी यूएस डिस्ट्रिक्ट कोर्ट फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ मॅसेच्युसेट्स मध्ये याचिका दाखल केली. ================== हैदराबादमध्ये लियोनेल मेस्सीने जिंकली मने अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी तब्बल 14 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आला असून, त्याचा अनुभव मात्र दोन शहरांत पूर्णपणे वेगळा ठरला. कोलकाता येथे गोंधळामुळे त्याला कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला. तर हैदराबादमध्ये मात्र मेस्सी चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि सन्मान अनुभवताना दिसला. कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियमयेथे निर्माण झालेल्या अराजक परिस्थितीमुळे मेस्सी अवघ्या 22 मिनिटांत मैदान सोडून निघून गेला. त्यामुळे कोलकाता दौऱ्याच्या आठवणी फारशा सुखद राहिल्या नाहीत. हैदराबादमध्ये मात्र चित्र वेगळे होते. येथे मेस्सीने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासोबत मैदानात फुटबॉल खेळला. तसेच, मुलांसोबत खेळत त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. मेस्सीसोबत लुईस सुआरेझ आणि रोड्रिगो डी पॉल हेही उपस्थित होते. ============================= मालिका लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेने गाशा गुंडाळला स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील चाहत्यांची लाडकी कला म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकरने प्रकृतीच्या कारणास्तव मालिका सोडली. यामुळे मालिकेच्या TRP वर त्याचा चांगलाच परिणाम झाल्याचा दिसतंय. आता लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिकाच संपणार आहे. दरम्यान अभिनेत्री ईशा केसकरने आपल्या मालिकेच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. आणि caption मध्ये मालिका सोडल्याबद्दल प्रेक्षकांची माफीही मागितलीय. मालिका बंद होणार असल्याने इशाने मालिकेत काम करतानाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. Video शेअर करत ईशाने लिहिलं, कला… अचानक निरोप घेतल्याबद्दल मनापासून सॉरी… तुम्ही प्रेक्षकांनी केलेल्या प्रेमासाठी मी कायम ऋणी राहील. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग…” असं तिने म्हटलं. ======================