Raj Thackeray : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार रंग चढलेला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) (Raj Thackeray) सलग धक्के बसत आहेत. माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सरचिटणीस राजा चौगुले आणि प्रवक्ते हेमंत कांबळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. आता जोगेश्वरी भागात मनसेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. मनसेचे विभाग प्रमुख आणि जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. संदीप ढवळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि उद्योजक ईश्वर रणशूर यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिंदे सेनेत प्रवेश केला. संदीप ढवळे हे कट्टर राज ठाकरे समर्थक मानले जातात. जय जवान गोविंदा पथकाच्या माध्यमातून त्यांनी युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली होती. तसेच ते मनसे नेते अविनाश जाधव यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षांतरामुळे जोगेश्वरी भागात मनसेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पक्षांतराची पार्श्वभूमीही चर्चेची आहे. जोगेश्वरीतील वार्ड क्रमांक ७४ मधून संदीप ढवळे यांच्या पत्नी सायली ढवळे या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) युतीमुळे हा वार्ड मनसेला सोडण्यात आला होता. मात्र, मनसेने या जागेवर विद्या भरत आर्या कांगणे यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या संदीप ढवळे यांनी पत्नी सायली ढवळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 2 जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संदीप ढवळे आणि सायली ढवळे यांनी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी ढवळे यांची समजूत काढली. त्यानंतर ढवळे दांपत्याने अपक्ष अर्ज मागे घेतला. त्याच दिवशी संदीप ढवळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले होते, “मी आणि माझी पत्नी सायली संदीप ढवळे यांनी राजसाहेब ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. साहेबांचा आदेश हाच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी अंतिम आहे.” मात्र, अवघ्या ६ दिवसांनंतर म्हणजे ८ जानेवारीला संदीप ढवळे यांनी शिंदे सेनेत प्रवेश करून मनसेला धक्का दिला. या पक्षांतरामुळे मनसेतील कार्यकर्त्यांच्या गळतीची मालिका सुरूच असल्याचे दिसते आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांचे प्रचाराला वेग आला आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मेळावा घेणार असून, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनीही संयुक्त प्रचार सुरू केला आहे. मात्र, दुसरीकडे मनसेला कार्यकर्त्यांच्या पक्षांतरामुळे अडचणी निर्माण होत आहेत. बीएमसी निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होत असून, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मनसेची ही गळती पक्षाच्या जागांवर परिणाम करू शकते.