नागपूर : राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असेदेखील राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला होता. या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याची बाब सदस्य अनिल पाटील यांनी विधानसभेत मांडली. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे निर्देश दिले. राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील अपुऱ्या चार्जिंग स्टेशन्सचा मुद्दा उपस्थित करत ई-वाहनांसाठी किमान १२० के.डब्लू. (kw) क्षमतेची फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच सध्या सध्या उपलब्ध चार्जिंग स्टेशन्सवर वाहन चार्जिंगसाठी आठ तास लागत असल्याने ही व्यवस्था तातडीने सुधारावी असेदेखील राहुल नार्वेकर म्हणाले. टोलमाफीचे धोरण २३ मे २०२५ रोजी जाहीर महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२५ अंतर्गत समृद्धी महामार्ग, मुंबई–पुणे द्रुतगती महामार्ग आणि शिवडी–न्हावाशेवा अटल सेतू या मार्गांवर ई-वाहनांना टोलमाफीचे धोरण २३ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आले असून, २२ ऑगस्ट २०२५ पासून अंमलबजावणी सुरू आहे. ईव्ही फास्टटॅग रजिस्ट्रेशन, एनआयसी डेटाबेसमधील नोंदणी आणि बँक इंटिग्रेशनची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी सभागृहाला दिली.