पुणे – महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निवडीवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये झालेला गोंधळ, मोठ्या आकाराचे प्रभाग, मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरलेले नवे उमेदवार आणि काहीही झाले तरी यंदा नगरसेवक व्हायचेच, या उद्देशाने मिळेल त्या पक्षाची उमेदवारी स्वीकारून लढणारे राजकीय कार्यकर्ते, या साऱ्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. त्याचे प्रतिबिंब मतदानात दिसून आले असून, तब्बल २ लाख २१ हजार २०९ मतदारांनी वरीलपैकी एकही उमेदवार नको, असा ठाम निर्णय घेत नोटाचा पर्याय निवडला आहे. २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा नोटा मतांचा आकडा सुमारे ५० हजारांनी वाढला असून, ही वाढ राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर मतदारांनी दिलेला स्पष्ट संदेश मानला जात आहे. आयारामांना संधी, निष्ठावंतांवर अन्याय महापालिका निवडणूक गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने इच्छुकांची संख्या मोठी होती. गेल्या दोन वर्षांत लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाच्या खासदार व आमदारकीच्या उमेदवारांसाठी पदरमोड करून गर्दी जमवली, मोठे कार्यक्रम आयोजित केले. त्यामुळे या वेळी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी देताना भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांनी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांपेक्षा निवडणुकीतील विजयाचे गणित अधिक महत्त्वाचे मानले. यासाठी इतर पक्षांतील इच्छुकांना संधी देण्यात आली. भाजपने सर्वाधिक २५ उमेदवार इतर पक्षांतून घेतले, तर राष्ट्रवादीने १० ते १२ जणांना उमेदवारी दिली. राजकीय गणित जुळले असले, तरी हा निर्णय मतदारांना पसंत पडला नाही. मतदारांचा संभ्रम तिकीट न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी इतर पक्षांच्या तिकिटावर निवडणूक लढवली. त्यामुळे स्थानिक उमेदवार निवडायचा, की पक्षाला मत द्यायचे, या कोंडीत सापडलेल्या मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. भाजपचे चार सदस्य ज्या प्रभागांत निवडून आले, त्या प्रभागांत नोटा मतांचा आकडा पाच ते सात हजारांच्या दरम्यान आहे. अशीच स्थिती राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेल्या प्रभागांतही दिसून आली. फ्लोटिंग मतदारांची नोटालाच पसंती शहराच्या अनेक भागांत, विशेषतः उपनगरांमध्ये फ्लोटिंग मतदारांची संख्या मोठी आहे. यामध्ये प्रामुख्याने सुशिक्षित वर्गाचा समावेश आहे. हे मतदार परिसरातील काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवतात. मात्र, या निवडणुकीत महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेली ३२ गावे आणि यापूर्वी समाविष्ट झालेल्या २३ गावांचे एकत्र प्रभाग करण्यात आले. राजकीय पक्षांनी गावांच्या राजकारणानुसार उमेदवारी दिल्याने अनेक प्रभागांत मतदारांसाठी उमेदवार पूर्णपणे नवखे ठरले. प्रचारासाठी मिळालेला कालावधी कमी असल्याने हे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. परिणामी मतदारांनी ओळखीच्या उमेदवारांनाच मते दिली, तर उर्वरित मते नोटाला दिली. हडपसर, धायरी परिसर, नऱ्हे- आंबेगाव, बालेवाडी, बाणेर, लोहगाव, विश्रांतवाडी, येरवडा या भागांत हे चित्र स्पष्टपणे दिसून आले. प्रचार मर्यादित, प्रभाग मोठे २०२१ ची जनगणना झालेली नसल्याने २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर महापालिकेची प्रभाग रचना करण्यात आली. शहराची मोठी हद्दवाढ झाल्याने प्रत्यक्ष लोकसंख्या व भौगोलिक रचना वेगळी ठरली. यामुळे मध्यवर्ती भागातील प्रभाग लहान, तर उपनगरांतील प्रभाग मोठ्या आकाराचे झाले. चार सदस्यीय प्रभाग रचना आणि मतदार यादी विभाजनामुळे दहापेक्षा अधिक प्रभागांची मतदारसंख्या १ ते दीड लाखाच्या घरात होती. प्रचारासाठी केवळ दहा ते अकरा दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याने अनेक उमेदवारांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. काहींनी केवळ आपल्याला अनुकूल भागांतच प्रचारावर भर दिला. या पार्श्वभूमीवर मतदारांनी नोटाला मते दिल्याचे सांगण्यात येत आहे. नोटाला मिळालेली मते २०१७ – १ लाख ७१ हजार ५८१ २०२६ – २ लाख २१ हजार २०९