२०१७ ला निवडून आलेल्या सर्व माजी नगरसेवकांचा पक्षाला जय महाराष्ट्र पुणे: शिवसेनेतील फूट, त्यानंतर पक्ष संघटनेला लागलेली गळती आणि नेत्यांचे संघटनात्मक बांधणीकडे झालेले दुर्लक्ष याचा मोठा फटका पुण्यात उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला बसला आहे. ठाकरे शिवसेनेचे २०१७ मध्ये निवडून आलेल्या दहा नगरसेवकांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. परिणामी, पक्षाकडे एकही माजी नगरसेवक शिल्लक राहिलेला नसून, आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला शून्यातूनच सुरुवात करावी लागणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये २००२ पासून शिवसेनेला भाजपसोबत युतीत ३० पर्यंत नगरसेवक निवडून आले होते. अगदी २०१७ च्या निवडणुकीपर्यंत पक्षाचे १५ ते २० नगरसेवक निवडून येत होते. मात्र, २०१७ मध्ये शिवसेना-भाजप युतीत फूट पडल्यानंतर शिवसेनेला दहा जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतरही काही काळ पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकून होते. पक्षाचे दोन तुकडे झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत माजी नगरसेवक नाना भानगिरे गेले. त्यानंतरही नऊ माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पक्षनिष्ठा दाखविली. जानेवारी २०२४ मध्ये बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची अल्हाट, पल्लवी जावळे आणि संगीता ठोसर यांनी भाजपमध्ये प्रवेश करत ठाकरे सेनेला मोठा धक्का दिला. त्यानंतर अविनाश साळवे यांनी काँग्रेसची वाट धरली. प्रभागरचना अनुकूल न झाल्याने दोन दिवसांपूर्वी श्वेता चव्हाण यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे सेनेत पालिकेतील पक्षाचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले हे दोनच नेते उरले होते. मात्र, त्यांनीही पक्षाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे २०१७ मध्ये निवडून आलेले शिवसेनेचे सर्व दहा नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने पुण्यात एकही माजी नगरसेवक उरलेला नाही. पक्ष नेतृत्वाचे दुर्लक्ष गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत पक्षाने केवळ कोथरूड विधानसभा मतदारसंघाची एकच जागा लढविली. त्यानंतर पक्ष संघटना मजबूत करणे, पक्ष सातत्याने चर्चेत ठेवण्यासाठी उपक्रम राबविणे आणि पक्षवाढीकडे लक्ष देणे याकडे दुर्लक्ष झाले.विशेष बाब म्हणजे पक्षाचे युवानेते अवघ्या दोन दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यावेळी कोणतीही संघटनात्मक बैठक झाली नाही. जे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत त्यांच्याशीही संवाद साधला गेला नाही. नेतृत्वाचे दुर्लक्षच पक्षाच्या वाताहतीस कारणीभूत ठरले. यांचा जय महाराष्ट्र भाजप : बाळा ओसवाल, विशाल धनवडे, प्राची अल्हाट, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, संजय भोसले, पृथ्वीराज सुतार शिवसेना (शिंदे गट) : नाना भानगिरे काँग्रेस : अविनाश साळवे राष्ट्रवादी काँग्रेस : श्वेता चव्हाण