मुंबई : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे, अग्रवालचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. गेल्या 17 महिन्यांपासून विशाल अग्रवाल जेलमध्ये आहे. पोर्शे कार अपघातप्रकरणी अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉ.अजय तावरेंचा जामीन सुद्धा न्यायालयाने फेटाळला आहे. 2024 मध्ये पुण्यातील कल्याणीनगर भागात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांना धडक देत, त्यांचा जीव घेतला होता. कारचालक हा अल्पवयीन असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले होते. मद्यप्राशन केलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कारचालकाचा बाप असलेल्या विशाल अग्रवालने मुलाला वाचवण्यासाठी कट रचला होता. त्यामुळे विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी पोलिसांकडूनही गैरवर्तन आणि निष्काळजीपणा करण्यात आल्याचे समोर आले होते. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.