पुणे : मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या पुणे पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काय होतं नेमकं प्रकरण? पुण्यातील कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ रोजी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या पोर्शे या लक्झरी कारने दुचाकीस्वारांना धडक दिली, त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. बांधकाम व्यावसायिकाच्या पोरगा वेदांत अग्रवाल याने मद्यधुंद अवस्थेत अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन तरुणांना चिरडले होते. यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रकरणानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत प्रकरण गेले होते. यामध्ये पोलिसांनी आरोपीला मदत केल्याचे आरोप करण्यात आला होता. यामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. अधिकाऱ्यांचे निलंबन दरम्यान आज या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. सुमारे दीड वर्षानंतर हि कारवाई करण्यात आली आहे. तसेच पोलीस शिपाई अमित शिंदे आणि आनंदा भोसले या दोघांना पाच वर्ष पदाच्या मूळ वेतनावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोपीला जामीन मिळाल्याने संतापाची लाट आरोपीने गुन्हा केला त्यावेळी तो १७ वर्षे ८ महिन्यांचा होता. केवळ चार महिने बाकी असल्याने त्याला प्रौढ म्हणून वागवण्याची मागणी पुणे पोलिसांनी न्यायालयाला केली होती. मात्र बाल न्याय मंडळाने अवघ्या १४ तासांत आरोपीला १०० शब्दांचा निबंध लिहायला सांगून जामीन मंजूर केला होता. यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त करण्यात आला होता.