Pune Crime : पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सचिन शिंदे यांना 35 हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने (ACB) रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे पौड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? अपघातानंतर दोन वाहनांतील व्यक्तींमध्ये मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात गाडी जप्त न करणे, अटक टाळणे आणि इतर कायदेशीर कारवाईत मदत करण्याच्या मोबदल्यात 35 हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला आणि सचिन शिंदे यांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. पुढील तपास सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतही कारवाई दरम्यान, मुंबईतील मालाड परिसरातही एसीबीने मोठी कारवाई केली होती. कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि एका पीएसआयला लाच घेताना अटक करण्यात आली. फिर्यादी वकिलांचा गुन्हा नोंदवण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप होता. त्यापैकी दोन लाख रुपये यापूर्वी स्वीकारले गेले होते. उर्वरित एक लाख रुपये घेताना एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले.