– माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा – उद्योगपती जेफ्री एपस्टीन, गोपनीय कागदपत्र प्रकरण – दोन विद्यमान, एका माजी खासदाराचा समावेश – मराठी माणूस पंतप्रधानपदी असेल पुणे – अमेरिकेतील उद्योगपती जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित गोपनीय कागदपत्रांमध्ये भारतातील दोन विद्यमान आणि एका माजी खासदाराचा समावेश असून, १९ डिसेंबरला ही कागदपत्रे उघड झाल्यावर देशात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहे. कदाचित भारताचा पंतप्रधान बदलेल. मराठी माणूस पंतप्रधानपदी असेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात आयोजित केलेल्या वार्तापालात पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जेफ्री एपस्टीनवर मानवी तस्करी, अल्पवयीन मुलींचे शोषण, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून गुप्त माहिती काढणे असे गंभीर गुन्हे असून या संदर्भातील गोपनीय कागदपत्रे एका महिन्यात खुली करण्याचा निर्णय अमेरिकेच्या सिनेटने घेतला आहे. यामध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, उद्योगपती बिल गेट्स, ब्रिटनच्या राजघराण्यातील ड्यूक ऑफ आर्क म्हणून ओखळले जाणारे प्रिन्स अँड्र्यू यांच्यासह अनेक राष्ट्राच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यात भारतातील तीन आजी-माजी खासदारांचा समावेश असून, ही कागदपत्रे खुली झाल्यावर त्याचे गंभीर पडसाद देशातील राजकारणात उमटून पंतप्रधानपदी बदल होऊ शकेल. दबावामुळे डोनाल्ड ट्रम्पने जाहीर केलेली युद्धबंदी मान्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर थांबविली, अशी टिकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. गोपनीय कागदपत्रे उघड होणार असल्यानेच् मोदी हतबल असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मतांच्या आधारे काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल म्हणून अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. अतिआत्मविश्वास आणि जागावाटपाच्या घोळाचा फटका काँग्रेसला बसला. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी दुबार-तिबार मतदान झाले. त्याविरुध्द महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कॉंंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बोगस मतदानाचा मोठा मुद्दा हाती घेतला आहे. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की, मतदार यादी स्पष्ट असली पाहिजे. मात्र, सत्ताधारी भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोग मतदार यादी सुधारत नाही. पूर्वीचा स्वायत्त निवडणूक आयोग आता सरकारचा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारला लाज वाटली पाहिजे… महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. मात्र, तो बाहेर काढायला आम्ही कमी पडत आहोत. त्यांना पाश्ववी मतदान मिळालं आहे. पण, आम्ही भांडत आहोत. महाराष्ट्रात एक ही मोठा प्रकल्प येत नाही याची सरकारला लाज वाटली पाहिजे. सरकार हे झोपलेलं आहे. शेतकऱ्यांच्या, आत्महत्या बेरोजगार सध्या सुरू आहे. विधानसभेत विरोधकांचे संख्याबळ कमी असल्याचा गैरफायदा घेत विरोधी पक्षनेतेपद दिले जात नाही. या दादागिरीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. विरोधकांनीही लोकांचे प्रश्न आक्रमकपणे मांडले पाहिजेत. संविधान बचाव, तिरंगा यात्रेत केवळ काँग्रेसचेच नेते सहभागी होतात. त्यामध्ये युवकांना, जनतेला जोडण्यात काँग्रेस कमी पडत असल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.