PSO Vidip Jadhav : बारामतीमधील भीषण विमान अपघातात महाराष्ट्राने अजित पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्वच गमावले आहे. तर अजित पवार यांच्यासोबत सावलीप्रमाणे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने शेवटपर्यंत दादांची साथ सोडली नाही. अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांचा देखील या विमान अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्यावर काल रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विदीप जाधव यांच्या मुलाने त्यांना मुखाग्नि दिला, तेव्हा उपस्थितांनाही आपले अश्रू थांबवता आले नाहीत. विदीप जाधव यांचे पार्थिव गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी तरडगाव येथे पोहोचले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी संपूर्ण गाव लोटले होते. ‘विदीप जाधव अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस दलाच्या वतीने त्यांना हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. PSO Vidip Jadhav : जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाण्यातील कळवा-विटावा परिसरातील कृष्णा विहार गल्लीत वास्तव्यास होते. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण वसाहत सुन्न झाली. विदीप जाधव यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, १४ वर्षांची मुलगी आणि ९ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. अपघाताच्या वेळी त्यांचे आई-वडील मूळ गावी होते. या चिमुकल्यांना आपल्या वडिलांचे छत्र हरपल्याची कल्पना देणेही कठीण झाले आहे. गेल्या २२ वर्षांपासून मुंबई पोलीस दलात असणाऱ्या जाधव यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या कर्तव्याचे पालन केले. अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू PSO Vidip Jadhav : चार्टर्ड विमानात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव, त्यांच्या सहकारी पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता. दुसऱ्यांदा धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला आणि या पाचही जणांनी जगाचा निरोप घेतला.