Assam Election: आसाम विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून, त्यांनी गुरुवारी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ‘संस्थात्मक भ्रष्टाचार’ आणि ‘मानवी हक्कांचे उल्लंघन’ यांसारखे गंभीर आरोप असलेले २० कलमी ‘जनतेचे आरोपपत्र’ (People’s Chargesheet) प्रसिद्ध केले. भ्रष्टाचाराचा समांतर अर्थव्यवस्थेला आश्रय: काँग्रेसचा आरोप गुवाहाटी येथील एका कार्यक्रमात हे आरोपपत्र प्रसिद्ध करताना प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि त्यांच्या मंत्र्यांनी राज्यात ‘भ्रष्टाचार आधारित समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आरोपपत्रातील मुख्य मुद्दे – बेकायदेशीर व्यापार: राज्यात बेकायदेशीर रॅट-होल मायनिंग, ‘बर्मीज सुपारी’ची अवैध वाहतूक आणि ड्रग्ज रॅकेटला सरकारचे संरक्षण असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनाकलनीय संपत्ती: मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर बेनामी आणि अवैध संपत्ती जमा केल्याचा आरोप यात आहे. अपूर्ण आश्वासने: कोच राजबोंगशी, ताई अहोम, मोरन, मोटोक, चुटिया आणि आदिवासी जमातींना ‘अनुसूचित जमाती’चा (ST) दर्जा देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मानवी हक्क आणि पोलीस कारवाई: राज्यात ‘बुलडोझर न्याय’ आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य करून केल्या जाणाऱ्या निष्कासनाचा मुद्दाही काँग्रेसने उचलून धरला आहे. तसेच, वाढते पोलीस एन्काउंटर आणि प्रतिबंधात्मक अटकेच्या प्रकरणांवरूनही सरकारला धारेवर धरले आहे. हेही वाचा – Iran-US tensions: अमेरिका-इराण युद्धाच्या शक्यतेनेच भाराताला मोठा आर्थिक फटका, युद्ध झाल्यास तर…. तळागाळातील लोकांशी संवाद साधून तयार केले आरोपपत्र – काँग्रेस खासदार प्रद्युत बोरदोलोई यांनी सांगितले की, हे आरोपपत्र केवळ राजकीय हेतूने तयार केलेले नाही. यासाठी पाच पथकांनी संपूर्ण राज्यभर फिरून तळागाळातील संस्था, स्थानिक संघटना, व्यावसायिक, विचारवंत आणि सामान्य जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत. निवडणुकीची रणनीती आणि प्रियांका गांधींचा दौरा – प्रियांका गांधी या आसाम काँग्रेसच्या ‘स्क्रीनिंग कमिटी’च्या अध्यक्षा आहेत. उमेदवारांची निवड करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. गुरुवारी त्या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह गुवाहाटीत दाखल झाल्या. पुढील दोन दिवसांत त्या जिल्हाध्यक्ष, आमदार आणि इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून निवडणूक रणनीतीवर शिक्कामोर्तब करणार आहेत. आसाममधील ही निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात असून, प्रियांका गांधींच्या या आक्रमक भूमिकेमुळे निवडणुकीतील चुरस वाढली आहे. निवडणुका कधी होणार? आसाम विधानसभेचा कार्यकाळ २० मे २०२६ रोजी संपत आहे, त्यामुळे त्यापूर्वी नवीन सरकार निवडण्यासाठी निवडणुका होणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, आसाममधील मतदान एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात (संभाव्यतः ३ ते ७ एप्रिल दरम्यान) होण्याची शक्यता आहे.