Praful Patel : महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या वाढत्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी एका मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल यांचे नाव घेतल्याने मोठा गदारोळ झाला. यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांचा धुरळा उडाला. मात्र प्रफुल पटेल यांनी तात्काळ स्पष्टीकरण देत, आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले. मोदी – शहा यांची भेट स्पष्टीकरणानंतरही प्रफुल पटेल यांच्या हालचालींनी चर्चांना अधिकच खतपाणी घातले. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांचा पुष्पहार घालून सत्कार करताना पटेल पुढे दिसले. अध्यक्षपदाच्या चर्चेला पूर्णविराम दिल्यानंतर केलेला हा सत्कार अनेक राजकीय संकेत देणारा मानला जात आहे. फडणवीस आणि पटेल यांचं एकत्र दर्शन दिल्लीतील भेटीनंतर प्रफुल पटेल थेट महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नाशिकमध्ये दिसले. जैन धर्मीयांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात फडणवीस आणि पटेल यांनी एकत्र दर्शन घेतले. यावेळी णमोकार तीर्थक्षेत्रासाठी राज्य सरकारकडून भरीव मदत करण्याची मागणी पटेल यांनी केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणाकडे जाणार, दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार का, आणि प्रफुल पटेल यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल, यावर जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. नव्या राजकीय समीकरणांचे संकेत दिल्लीच्या राजकारणात प्रभावी पकड असलेले प्रफुल पटेल हे शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंत विश्वासू दुवा राहिले आहेत. मात्र सध्या राष्ट्रवादीपेक्षा मित्रपक्ष भाजपच्या नेत्यांबरोबर त्यांचा वाढता वावर नव्या राजकीय समीकरणांचे संकेत देतो आहे. आगामी काळात प्रफुल पटेल राष्ट्रवादीतच राहून भूमिका बजावणार, की वेगळी रणनीती आखणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.