पुणे (संजय कडू) – डिजिटल सुविधांचा विस्तार होत असतानाच सायबर गुन्हेगारांची हिंमतही वाढत चालली आहे. डिजिटल अरेस्ट, क्रेडिट कार्ड घोटाळे आणि नेटबँकिंग फसवणुकीनंतर आता सीबीआय, गृह मंत्रालय आणि इंटरपोलच्या नावाने नागरिकांना घाबरवणारा नवा ई-मेल स्कॅम समोर आला आहे. तुम्ही अश्लील व्हिडीओ पाहत असून, तुमच्या आयपी अॅड्रेसवरून बाल लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित हालचाली आढळल्या आहेत, असा गंभीर आरोप करीत २४ तासांत उत्तर न दिल्यास अटक वॉरंट काढण्याची धमकी दिली जात आहे. गेल्या काही दिवसांत अनेक नागरिकांना असे धक्कादायक ई-मेल प्राप्त झाले आहेत. हे मेल अत्यंत अधिकृत भाषेत, कायद्याच्या कलमांचा उल्लेख करीत, सीबीआय, गृह मंत्रालय आणि इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटरचा संदर्भ देऊन पाठवले जात आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक घाबरून जात असून, मेलला उत्तर देण्याचा किंवा अॅटॅचमेंट उघडण्याचा धोका निर्माण होत आहे. फसवणुकीची ओळख करताना… तज्ज्ञांनी सांगितले की, या मेल्समधील सर्वात मोठा इशारा म्हणजे पाठवणाऱ्याचा ई-मेल आयडी. हे मेल बहुतेक वेळा @gmail.com सारख्या फ्री डोमेनवरून पाठवलेले असतात. तसेच इतरही डोमेनवरून पाठवले गेल्याची उदाहरणे आहे. कोणतीही सरकारी यंत्रणा अशा ई-मेलवरून संपर्क साधत नाही. तसेच, हे मेल ‘To’ मध्ये न येता ‘BCC’ मध्ये आलेले असतात, म्हणजेच ते एकाच वेळी अनेकांना पाठवलेले असतात. याशिवाय, मेलसोबत संशयास्पद JPEG फाईल जोडलेली असते. ती उघडल्यास मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये रॅन्समवेअर इन्स्टॉल होण्याचा धोका असतो. कायदा तज्ज्ञांचा इशारा – सायबर कायदे तज्ज्ञ ॲड. गौरव जाचक यांनी स्पष्ट केले की, सीबीआय, गृह मंत्रालय किंवा कोणतीही सरकारी संस्था ई-मेलवरून अटक करण्याची धमकी देत नाही. या स्कॅमचा एकमेव उद्देश भीती निर्माण करून पैसे उकळणे किंवा नागरिकांचा डेटा चोरणे हाच आहे. अनेकदा नागरिकांनी पूर्वी कधीतरी पॉर्न साइट पाहिलेली असते किंवा संबंधित सर्च केलेला असतो. त्यामुळे आपण अडचणीत सापडलो का? अशी भीती निर्माण होते आणि याच भीतीचा गैरफायदा घेतला जातो. तर काही वेळा सरसकट ई मेल पाठवले जातात. एकदा मेलमधील फाईल उघडली की हॅकर तुमची सिस्टीम ताब्यात घेऊन डेटा चोरणे, ऑनलाइन हालचालींवर नजर ठेवणे आणि नंतर ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतो. ७९ वर्षीय निवृत्त अभियंत्याची ३६ लाखाची फसवणूक – ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी बनावट गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देत धायरी येथील ७९ वर्षीय निवृत्त अभियंत्याची तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपींनी स्वतःला डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया व मुंबई पोलीस असल्याचे भासवून अश्लील कॉल व पॉर्नोग्राफीचा खोटा आरोप केला. बनावट अटक वॉरंट पाठवून भीती घातली आणि चार वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरायला लावले. तक्रारीनंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “संशयास्पद ई-मेल्सना उत्तर देऊ नका” – स्वप्नाली शिंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,सायबर पोलीस ठाणे) संशयास्पद ई-मेल्सना उत्तर देऊ नका तसेच कोणतीही अॅटॅचमेंट किंवा लिंक क्लिक करू नका. याप्रकारच्या ई मेल्सची तक्रार cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर करा. कुटुंबीय आणि मित्रांनाही या स्कॅमबाबत जागरूक करा.