PMC Election Result: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये आज मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ-नाना पेठ) मध्ये मोठा फेरबदल झाला आहे. कसबा विधानसभेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार सोनाली आंदेकर यांनी त्यांचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे, सोनाली आंदेकर यांनी ही निवडणूक तुरुंगातून लढवली होती. आयुष कोमकर हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून त्या सध्या जेलमध्ये आहेत. न्यायालयाने त्यांना केवळ उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी दिली होती. गुंड बंडू आंदेकर यांच्या सून असलेल्या सोनाली यांनी अटीतटीच्या लढतीत प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला. रवींद्र धंगेकर यांनी जेव्हा कसब्याची विधानसभा पोटनिवडणूक जिंकली होती, तेव्हा आंदेकर कुटुंब त्यांच्या पाठीशी होते. मात्र, यावेळेस राजकीय समीकरणे बदलली. आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य (सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर) राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरल्याने धंगेकरांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना खिंडार पडले. चौथ्या फेरीपासूनच आंदेकरांनी घेतलेली आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवत विजय संपादन केला. दरम्यान, लक्ष्मी आंदेकर या देखील विजयी झाल्या आहेत. या निकालामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. पुण्यात भाजप सत्ता स्थापन करणार – दरम्यान, 165 नगरसेवक संख्या असलेल्या पुणे महानगरपालिकेत भाजपला मोठे यश मिळत असल्याचे दिसत आहे. काही वेळापूर्वीच्या आकडेवारीनुसार, भाजप 80 जागांवर विजयी, आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट 7, राष्ट्रवादी शरद पवार 3, काॅंग्रेस 3, शिवसेना शिंदे गट 2 जागांवर पुढे आहे.