PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्याचे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे, घरून काम पुन्हा सुरू करण्याचे, अनावश्यक खरेदी टाळण्याचे आणि परदेश प्रवास टाळण्याचे आवाहन केले. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी परकीय चलन वाचवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. पंतप्रधान म्हणाले की, देशभक्ती म्हणजे केवळ प्राणांचे बलिदान देणे नव्हे, तर कठीण काळात जबाबदारीने जगणे हे देखील आहे. नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन का केले याचा अर्थ नेमका काय आहे ? जाणून घेऊ… मेट्रो आणि ईव्हीचा अवलंब पंतप्रधान मोदींनी लोकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी मेट्रो, कारपूल आणि ईव्हीचा अवलंब करण्यावर भर दिला. याचे कारण असे की, भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के तेलाची आयात करतो, तर कच्च्या तेलाची किंमत १२० डॉलरच्या पुढे गेली आहे. घरून काम (वर्क फ्रॉम होम) पंतप्रधान मोदींनी घरून काम करण्यावर भर दिला. यामागे एक सोपे गणित आहे. केवळ कार्यालयात येण्या-जाण्यासाठी दररोज लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेल जाळले जाते. जर कॉर्पोरेट कंपन्यांनी आठवड्यातून काही दिवस जरी घरून कामलागू केले, तर इंधनाचा वापर आणि आयातीचा भार दोन्ही कमी होऊ शकतात. १ वर्षासाठी परदेश प्रवास पुढे ढकला पंतप्रधानांनी नागरिकांना अनावश्यक परदेश प्रवास, परदेशातील सुट्ट्या आणि परदेशी विवाहसोहळे टाळून, तसेच देशांतर्गत पर्यटनावर लक्ष केंद्रित करून आणि भारतातच कार्यक्रम आयोजित करून परकीय चलन साठा जपण्यास मदत करण्याचे आवाहन केले आहे. रुपया ८५ वरून ९३ पर्यंत घसरल्याने डॉलर वाचवणे आवश्यक आहे. PM Modi: १ वर्षासाठी सोने खरेदी करू नका पंतप्रधान मोदींनी लोकांना एक वर्षासाठी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोने खरेदीदार देश आहे आणि दरवर्षी अंदाजे ५९ अब्ज डॉलर, म्हणजेच अंदाजे ५ लाख कोटी रुपयांची आयात करतो. केवळ एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांतच २६.५१ अब्ज डॉलर किमतीच्या सोन्याची आयात झाली. ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या आयातीत २०० टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे व्यापार तूट विक्रमी ४१.६८ अब्ज डॉलरवर पोहोचली. एसबीआयच्या संशोधनानुसार, सोन्याच्या किमतीचा आणि रुपयाच्या घसरणीचा थेट संबंध आहे. जेव्हा सोने महाग होते, तेव्हा रुपयाचे आणखी अवमूल्यन होते. भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदी करा पंतप्रधान मोदींनी नागरिकांना ‘मेड-इन-इंडिया’ आणि स्थानिक पातळीवर उत्पादित वस्तूंना प्राधान्य देण्यास प्रोत्साहित केले आहे, ज्यात शूज, बॅग आणि ॲक्सेसरीजसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंचा समावेश आहे. याचे कारण म्हणजे २०२५-२६ मध्ये भारताची व्यापार तूट वाढत आहे. चीन आणि इतर देशांकडून येणाऱ्या स्वस्त वस्तूंमुळे ही तूट आणखी वाढते. भारतीय वस्तू खरेदी केल्याने आयात कमी होईल आणि देशाच्या उद्योग व रोजगाराला फायदा होईल. खतांचा वापर ५० टक्क्यांनी कमी करा, सौर पंप बसवा पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर ५० टक्क्यांनी कमी करण्याचे, नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आणि डिझेल पंपांऐवजी सौर पंप बसवण्याचे आवाहन केले आहे. भारत आपल्या युरियाच्या २५ टक्के, फॉस्फेटच्या ९० टक्के आणि पोटॅशच्या १०० टक्के गरजा परदेशातून आयात करतो. २०२३-२४ मध्ये, केवळ खत अनुदानाचा भार १.७५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. युरिया उत्पादनासाठी नैसर्गिक वायूची आवश्यकता असते, जो स्वतः आयात केला जातो. पश्चिम आशियातील संकटाच्या काळात, गॅसच्या किमती वाढल्या, त्याचबरोबर खतांच्या किमतीही वाढल्या आणि सरकारी अनुदानातही वाढ झाली. खतांच्या किमती कमी केल्याने ही संपूर्ण साखळी विस्कळीत होते.