Rohit Pawar : बारामती येथील काटेवाडी मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. बारामती येथील पिंपळी येथे जात रोहित पवार यांनी मतदान केले. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘दादांच शेवटचं स्वप्न पूर्ण होईल आणि जिल्हा परिषदेत जास्तीत जास्त सदस्य निवडून येतील,’ असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासोबतच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर बोलताना रोहित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर १० फेब्रुवारी आणि १२ फेब्रुवारी अशा दोन पत्रकार परिषदा घेणार असल्याचे जाहीर केले. १० तारखेला होणारी पत्रकार परिषद ही अजितदादांच्या विमान अपघातातबाबत घेणार असून, माझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत, त्यावर बोलणार असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले. तसेच १२ तारखेला दुसरी पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषेदत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दादांची इच्छा नेमकी काय होती, विलिनीकरणासाठी १२ तारीखच का? विलिनीकरण का आणि कशासाठी होणार होते? यावर सविस्तर बोलणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. त्यामुळे रोहित पवार या दोन्ही पत्रकार परिषदेतून कोणते गौप्यस्फोट करणार? विमान अपघातासह विलिनीकरण आदींवर काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे. फोटोवरून रंगली चर्चा रोहित पवार म्हणाले…. अजित पवार यांच्या निधानानंतर बारामती येथील निवासस्थानी राज्यभरातून सर्वपक्षीय नेते पवार कुटुंबाची भेट घेण्यासाठी येत आहेत. या दुःखद प्रसंगी पवार कुटुंब एकमेकांना धीर देत आहेत. काल रोहित पवार, शरद पवार आणि पार्थ पवार यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. शरद पवार दोघांना नेमकं काय सांगत होते अशी चर्चा रंगली होती. यावर रोहित पवार यांनी सांगितले की, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. येत्या काळात काही गोष्टी होणार आहेत. राजकीय नाहीत, एखादी गोष्ट जर त्यांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलवून घेऊन मार्गदर्शन करत असल्याचे रोहित पवार म्हणाले. हेही वाचा : Sunetra Pawar : अजितदादांशिवाय पहिलीच निवडणूक: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क