Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया आज, 26 एप्रिल 2026 रोजीच्या टॉप 10 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी… १) १ मेपासून ‘मराठी अनिवार्य’; रिक्षा-टॅक्सी संघटनांचा एल्गार मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून वाद चिघळला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावानुसार २ मे २०२६ पासून मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची तरतूद असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या निर्णयाला ऑटो-टॅक्सी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवला आहे. संघटनेचे नेते शशांक राव यांनी हा निर्णय अन्यायकारक व गैरकायदेशीर असल्याचे म्हणत तो तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केलीय. यासाठी २७ एप्रिल रोजी गोरेगाव येथे जाहीर सभा बोलावण्यात आली असून मोठ्या संख्येने चालक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. २) शरद पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखाला अटक पिंपरी-चिंचवड येथे सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सोशल मीडिया विभागाचे राज्य प्रमुख महादेव बालगुडे यांना अटक केलीय. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचा आणि नक्षलवादी विचारसरणीचे समर्थन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मॉर्फ करून तो आक्षेपार्ह स्वरूपात व्हायरल करण्यात आला होता. तसेच नक्षलवादी नेता हिडमा याचे उदात्तीकरण करणारी सामग्रीही शेअर करण्यात आल्याचा दावा आहे. या प्रकरणी एका वकिलाने पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर गुन्हा नोंदवत पोलिसांनी बालगुडे यांना अटक केलीय. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे. ३) महाराष्ट्रात लग्नाचे नियम बदलणार? बालहक्क आयोगाची मोठी शिफारस महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने राज्य सरकारला लग्नाच्या पत्रिकेत वर-वधूची जन्मतारीख छापणे अनिवार्य करण्याची शिफारस केलीय. या निर्णयामागे बालविवाह आणि बाल लैंगिक शोषणावर आळा घालण्याचा उद्देश आहे. राजस्थानच्या धर्तीवर हा नियम लागू करण्याचा विचार असून, अलीकडे सोलापूरसह राज्यात अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याच्या अनेक प्रकरणांनंतर ही शिफारस करण्यात आलीय. आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांनी ही परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटलेय. आयोगाने सर्व जिल्ह्यांत विशेष संयुक्त पथक स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. या पथकाला संशयित प्रकरणांची चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ४) मंगळवेढ्यात दुर्दैवी घटना; आईसह दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू मंगळवेढा तालुक्यातील खडकी साठवण तलावात आईसह दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. शुक्रवारी सायंकाळी जळण आणण्यासाठी गेलेल्या वैशाली घोडके (३५), मुलगी श्रेया (१२) आणि मुलगा सोहम (१०) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता तलावाजवळ त्यांचे साहित्य आढळले. संशय आल्याने स्थानिकांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री उशिरा आईचा मृतदेह सापडला, तर पंढरपूरच्या बचाव पथकाने शनिवारी सकाळी दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. ५) टेकऑफआधी विमानाला आग, बाहेर पडताना अनेक जण जखमी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. झ्युरिचकडे जाणाऱ्या SWISS International Air Lines च्या विमानाच्या लँडिंग गिअरमधून टेकऑफपूर्वी अचानक धूर निघू लागल्याने खळबळ उडाली. या विमानात २२८ प्रवासी आणि चार लहान मुले होती. स्थिती गंभीर होताच तात्काळ आपत्कालीन प्रक्रिया राबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र, गोंधळात विमानातून बाहेर पडताना किमान चार प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे. अग्निशमन दलाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असून धूर नेमका कशामुळे निघाला याचा तपास सुरू आहे. ६) हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड आपच्या राज्यसभेतील १० पैकी ७ खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसलाय. आप खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह सात जणांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजन सिंग यांचाही समावेश आहे. प्रवेशानंतर पंजाब सरकारने दणके देण्यास सुरुवात केली असून हरभजन सिंग यांची सुरक्षा काढलीय. याबाबतची माहिती स्वीय सहाय्यक मनदीप सिंग यांनी दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार, हरभजन सिंग यांच्या घराबाहेर तैनात असलेले सुमारे नऊ ते दहा सुरक्षा कर्मचारी हटवण्यात आलेत. तसेच त्यांना देण्यात आलेली सरकारी पायलट कारही परत घेतलीय. हरभजन सिंग यांनी या घटनाक्रमांवर आतापर्यंत मौन बाळगले असले तरी, सुरक्षा काढून घेणे हा सरकारच्या नाराजीचा स्पष्ट संकेत मानला जातोय. ७) बँक कर्मचाऱ्यांची चांदी! पगारवाढीचा मार्ग मोकळा सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने १३ व्या द्विपक्षीय वेतन करारासाठी वाटाघाटी सुरू करण्याचे निर्देश दिलेत. तसेच हा करार पुढील १२ महिन्यांत अंतिम करण्यास सांगण्यात आलेय. या करारानुसार बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पगारात सुधारणा १ नोव्हेंबर २०२७ पासून लागू होणार आहे. दर पाच वर्षांनी वेतन पुनरावलोकनाची परंपरा असून, इंडियन बँक्स असोसिएशन कर्मचारी संघटना आणि युनियनसोबत चर्चा करून वेतन करार निश्चित करते. यावेळीही सर्व संबंधित पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. अर्थ मंत्रालयाने बँकांना वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यामुळे पगारवाढ लवकरच निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ८) BMW ने लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, किंमत 4.7 लाखांपासून BMW ने भारतीय बाजारात आपली नवी BMW F 450 GS बाईक लॉन्च केलीय. अॅडव्हेंचर बाईकप्रेमींसाठी ही मोठी बातमी असून, ही कंपनीची भारतातील सर्वात परवडणारी बाईक ठरणार आहे. या बाईकची किंमत सुमारे 4.7 लाख ते 5.3 लाख दरम्यान ठेवण्यात आलीय. ही बाईक Base, Exclusive आणि Trophy अशा तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. Base आणि Exclusive व्हेरिएंट Cosmic Black रंगात, तर Trophy व्हेरिएंट Racing Blue Metallic रंगात सादर करण्यात आला आहे. इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, यात 450cc ट्विन-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे, जे 48 HP पॉवर आणि 43 Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन पूर्वीपेक्षा अधिक स्मूथ आणि दमदार असल्याचा दावा कंपनीने केलाय. ९) अभिनेत्री गायत्री दातार अडकणार विवाहबंधनात मराठी अभिनेत्री गायत्री दातार लवकरच विवाहबंधनात अडकणार असून तिच्या घरी लग्नसराईला सुरुवात झालीय. काही दिवसांपूर्वीच तिने प्रियकर श्रीकांत चवरेसोबत प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता दोघांच्या लग्नाची चर्चा रंगलीय. अलीकडेच गायत्रीचा मेहंदी समारंभ जल्लोषात पार पडला. या सोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत “मेहंदी रंगली गं…” असे कॅप्शन दिले आहे. हिरव्या रंगाच्या आकर्षक पोशाखात गायत्री अत्यंत सुंदर दिसत होती, तर श्रीकांतने पांढऱ्या-हिरव्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. चाहत्यांकडून या जोडीवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. गायत्रीने तुला पाहते रे मालिकेतून लोकप्रियता मिळवली होती. आता तिच्या आयुष्यातील नव्या पर्वाची चाहत्यांना उत्सुकता लागलीय. १०) संजू सॅमसनचा ऐतिहासिक पराक्रम; रैना-धोनीला मागे टाकत बनला सर्वात वेगवान भारतीय! चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना संजू सॅमसनने आयपीएलमध्ये ५००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे, सर्वात कमी चेंडूंमध्ये हा पल्ला गाठणारा तो सर्वात वेगवान भारतीय खेळाडू ठरला आहे. संजूने केवळ ३५५५ चेंडूंत हे यश मिळवून सुरेश रैनाचा (३६२० चेंडू) विक्रम मोडीत काढला. जागतिक स्तरावर तो एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने या शर्यतीत केएल राहुल आणि एमएस धोनी या दिग्गजांनाही मागे टाकले. या सामन्यात तो ११ धावांवर बाद झाला असला, तरी १८५ सामन्यांतील ५००८ धावा आणि ५ शतकांसह त्याने आपली विशेष छाप पाडली आहे.