पिंपरी – बारामती ही माझी जन्मभूमी असली तरी पिंपरी चिंचवड ही माझी कर्मभूमी आहे. मी अनेकांना पदे दिली. मात्र काहींनी पदे दिल्याचे भान ठेवले नाही, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. माणुसकी सोडलेल्या या मंडळींना घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले. पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ पिंपरी गावात आयोजित जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, गिरीजा कुदळे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक नाना काटे, राम आधार धारिया, श्रीरंग शिंदे, विजय कापसे, शांती सेन, विजय लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, पुणे मुंबई महामार्ग रावेत येथे वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहन पार्किंग करण्यासाठी लोकांना जागा उपलब्ध नाही याला कारण पालिकेत आता जे सत्तेत होते त्यांच्याकडे व्हिजनच नाही. त्यांचे लक्ष फक्त टेंडरमध्ये रिंग करणे, दादागिरी यावरच आहे. काही लोकांच्या मालमत्ता कशा वाढल्या, ते पहा तुमच्या लक्षात येईल. प्रारूप विकास आराखड्यावर पन्नास हजार हरकती आल्या आहेत. आळंदीलगत कत्तलखाना प्रस्तावित केला. यांच्याकडे व्हिजन नाही. यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी संजोग वाघेरे यांचे नाव न घेता टीका केली. काही मंडळी कोण संदीप वाघेरे असे विचारतात. मात्र जनतेने मला निवडून दिले तेव्हापासून मी अनेक विकास कामे केली. त्यामुळे मी टीमकी नाही. ढोल वाजवतो असे ते म्हणाले. काहींनी सरड्याप्रमाणे रंग बदलले. पालिकेच्या ठेक्यांवर जगणारी ही पिल्लावळ घरी बसवा असे आवाहन त्यांनी केले. त्याचा उल्लेख करून अजित पवार म्हणाले की, संदीप वाघेरे यांच्यासारखी स्वखर्चाने कामे करणारी माणसे आजकाल दिसत नाहीत. संदीप वाघेरे यांनी काही मंडळींचा सरड्याप्रमाणे रंग बदलणारे असा उल्लेख केला. आता ते रंग बदललेले तुमच्याकडे येतील. पाय धरतील पण त्यांना घरी बसवा असे आवाहन पवार यांनी केले. –