Boat Accident : फिलिपाईन्सच्या दक्षिण भागात एका बेटाजवळ मोठी सागरी दुर्घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३५० हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक प्रवासी बोट समुद्रात बुडाल्याची घटना घडली. या अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून २८ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. ‘एएफपी’ (AFP) वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बचाव पथकांनी किमान ३०१ प्रवाशांना सुखरूप वाचवलं आहे. ही बोट झांबोआंगा या बंदर शहरातून सुलू प्रांतातील जोलो बेटाकडे निघाली होती. या बोटीत ३३२ प्रवासी आणि २७ क्रू मेंबर्स, असे एकूण ३५९ जण होते. नेमकं काय घडलं? कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर बोटीत तांत्रिक बिघाड झाला आणि काही वेळातच ती समुद्रात बुडू लागली. प्रवास सुरू झाल्यानंतर सुमारे चार तासांनी, स्थानिक वेळेनुसार पहाटे १.५० वाजता जहाजाकडून संकटाचा संदेश पाठवण्यात आला होता. आतापर्यंत ३१६ जणांना वाचवले फिलिपाईन्स कोस्ट गार्डचे कमांडर रोमेल दुआ यांनी एएफपीला सांगितलं की, बालुक द्वीप गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. वाचलेल्या प्रवाशांना याच बेटावर सुरक्षितपणे हलवण्यात आलं आहे. आतापर्यंत ३१६ जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून, त्यापैकी १५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. नौदल आणि वायुसेनेची पथके घटनास्थळी दाखल दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी कोस्ट गार्डचे विमान, नौदल आणि वायुसेनेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बसिलनचे गव्हर्नर मुजीब हाटामन यांनी इसाबेला पोर्टवरील रेस्क्यू ऑपरेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये वाचवलेल्या प्रवाशांना बोटीतून बाहेर काढताना आणि काहींना स्ट्रेचरवर नेताना दिसत आहे. स्थानिक रेडिओशी बोलताना गव्हर्नर हाटामन यांनी सांगितलं की, बहुतेक प्रवासी सुरक्षित असले तरी अनेक वृद्ध प्रवाशांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज आहे. फिलिपाईन्समध्ये ३५९ प्रवाशांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात बुडाली दरम्यान, बोट नेमकी कशामुळे बुडाली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असं कोस्ट गार्डने स्पष्ट केलं आहे. बंदरातून निघण्यापूर्वी बोटीला कोस्ट गार्डकडून परवानगी देण्यात आली होती आणि ओव्हरलोडिंगचे कोणतेही संकेत नव्हते, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. फिलिपाईन्समध्ये सागरी अपघात वारंवार घडत असतात. चक्रीवादळे, जहाजांची अपुरी देखभाल, प्रवाशांची गर्दी आणि सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी न होणं ही अशा दुर्घटनांची प्रमुख कारणं मानली जातात. हेही वाचा : नक्षलवादाला हादरा; हिडमानंतर टॉप कमांडर बर्से देवाचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण