PCMC Election: एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजप आमदार शंकर जगताप यांनी पिंपरीत भाजपचा एकतर्फी विजय होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच खळबळजनक दावा केला आहे. राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद प्रचंड वाढली असून, १२८ पैकी १२५ जागा भाजप जिंकेल असा दावा त्यांनी केलाय. तसेच उर्वरित कोणत्या 3 जागा अजित पवारांची राष्ट्रवादी जिंकणार या प्रश्नाचं उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. राहुल कलाटे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आता तेच भाजपसोबत आल्याने चिंचवड आणि परिसरात भाजपची पकड अधिक घट्ट झाल्याचे चित्र आहे. यापूर्वी जगताप यांनी १०० जागांचा आकडा सांगितला होता, मात्र कलाटेंच्या एन्ट्रीमुळे त्यांनी आता १२५ जागांचा दावा केला आहे. दरम्यान, अजितदादांना मिळणाऱ्या त्या तीन जागा कोणत्या? या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र त्यांनी टाळले. कलाटेंच्या प्रवेशामुळे जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होईल का? यावर बोलताना जगताप म्हणाले की, “भाजपमध्ये संघटनात्मक काम चालते. पक्षश्रेष्ठींचा आदेश अंतिम असतो. आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, त्यांना योग्य वेळी न्याय दिला जाईल.” दुसरीकडे, भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.