Pakistan players banned in The Hundred by IPL owners : क्रिकेट जगतातील हाय-प्रोफाईल लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेतून पाकिस्तानी खेळाडूंची गच्छंती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या स्पर्धेतील ज्या संघांचे मालकी हक्क आयपीएलमधील फ्रँचायझींकडे आहेत, त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करून न घेण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. ४ संघांचे भारतीय मालक घेणार कठोर भूमिका? ‘द हंड्रेड’मधील आठपैकी चार संघांचे आंशिक किंवा पूर्ण स्वामित्व आता आयपीएलमधील भारतीय मालकांकडे आले आहे. यामध्ये खालील संघांचा समावेश आहे: मॅनचेस्टर सुपर जायंट्स एमआय लंडन सदर्न ब्रेव्ह सनरायझर्स लीड्स सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर, हे भारतीय मालक आपल्या संघात पाकिस्तानी खेळाडूंना स्थान देण्यास इच्छुक नाहीत. केवळ आयपीएलच नव्हे, तर दक्षिण आफ्रिकेतील SA20 आणि कॅरिबियन प्रीमियर लीगमध्येही आयपीएल मालकांनी पाकिस्तानी खेळाडूंना डावलले आहे. आयपीएल मालकांकडून द हंड्रेडमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी ११ आणि १२ मार्चला होणार लिलाव – ‘द हंड्रेड’च्या आगामी हंगामासाठी लंडनमध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ११ मार्च रोजी महिला आणि १२ मार्च रोजी पुरुष खेळाडूंवर बोली लावली जाईल. या लिलावासाठी १८ देशांतील जवळपास १००० खेळाडूंनी नोंदणी केली आहे. यामध्ये मोहम्मद आमीर, शाहीन आफ्रिदी, शादाब खान आणि हॅरिस रौफ यांसारख्या मोठ्या पाकिस्तानी नावांचा समावेश आहे. मात्र, आयपीएलशी संबंधित चार मोठे संघ त्यांच्यावर बोली लावण्याची शक्यता धूसर आहे. हेही वाचा -Cricket Umpire Dies : क्रिकेटच्या मैदानात धक्कादायक घटना! मधमाशांच्या भीषण हल्ल्यात ६५ वर्षीय पंचांचा मृत्यू ईसीबीच्या आश्वासनाचे काय? इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे (ECB) कार्यकारी अध्यक्ष रिचर्ड गोल्ड यांनी यापूर्वी आश्वासन दिले होते की, भारतीय गुंतवणुकीनंतरही खेळाडूंमध्ये देशाच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. मात्र, बीबीसीच्या रिपोर्टनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अनौपचारिकपणे सांगितले आहे की, आयपीएल मालक पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.