Pakistan News: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बलुचिस्तानच्या निर्वासित सरकारने शरीफ यांच्यावर व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि बलुचिस्तानच्या संप्रभुततेचा अवमान केल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे. स्वातंत्र्यवादी नेते मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर यासंदर्भात अधिकृत घोषणा केल्यामुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मीर यार बलोच यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, शाहबाज शरीफ यांनी बलुचिस्तानच्या हद्दीत विनापरवाना प्रवेश करून तिथल्या प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन केले आहे. स्वतःला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र मानणाऱ्या बलुचिस्तानच्या निर्वासित सरकारने स्पष्ट केले आहे की, शरीफ यांचे हे पाऊल त्यांच्या देशाच्या हवाई क्षेत्राचे आणि इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. या पार्श्वभूमीवर, शाहबाज शरीफ हे बलुचिस्तानमधील कोणत्याही विमानतळावर आले किंवा तिथून प्रवास करत असताना आढळले, तर त्यांना तात्काळ अटक करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाने पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. बलुचिस्तानच्या या गटाने ही कारवाई त्यांच्या घोषित कायद्यांच्या चौकटीत राहून करत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही पदावरील व्यक्तीला, मग ते पाकिस्तानचे पंतप्रधान का असेनात, बलुचिस्तानच्या कायद्यातून सवलत मिळणार नाही, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. हे केवळ शाहबाज शरीफ यांच्यापुरते मर्यादित नसून, पाकिस्तानी लष्करप्रमुख आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हा शेवटचा इशारा असल्याचेही बलोच यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्याच्या घडीला या खळबळजनक दाव्यावर पाकिस्तान सरकार किंवा तिथल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, बलुचिस्तानमधील फुटीरतावादी चळवळ आणि तिथल्या निर्वासित सरकारने थेट पंतप्रधानांविरुद्धच अशा प्रकारचे वॉरंट काढल्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे.