“आता मी स्वतः मैदानात उतरणार”! पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या जनतेने सर्व राजकीय आडाखे मोडीत काढत भाजपला जे अनपेक्षित आणि अभूतपूर्व यश दिले आहे, ती आमच्यावरील विश्वासाची पोचपावती आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी महापौर निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मी स्वतः पुण्याच्या मैदानात उतरणार आहे.या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवलेल्या नवनियुक्त नगरसेवकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी माध्यमाशी बोलताना त्यांनी आगामी काळातील भाजपची रणनीती आणि विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. …म्हणून महापौर निवडीसाठी लागणार किमान १५ दिवस निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांना पालिकेची पायरी चढण्यासाठी आणखी २० ते २२ दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. महापौरपदाची आरक्षण सोडत शासनाने काढलेली नसल्याने उमेदवारांना महापौर निवडीनंतरच नगरसेवकपदाचा मान स्विकारता येणार आहे.सरकार येत्या तीन-चार दिवसात आरक्षण सोडत काढणार असून त्यानंतर, मुख्य सभा बोलवणे, निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करणे तसेच निवडणुकीचा कार्यक्रम राबविणे यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. महापौर निवडीची पहिली मुख्यसभा झाल्यानंतरच निवडलेले उमेदवार नगरसेवक होतात. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांना काही काळ थांबावे लागणार आहे. पुणे निकालानंतर अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला पुणे महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपचे कमळ शहरात फुलवत भाजपला संधी दिली आहे. यातच आता सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले आहे. मात्र निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीतील त्यांच्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुण्यातील धक्कादायक निकालानंतर दोन्ही नेत्यांमध्ये होणारी ही पहिलीच भेट आहे. ही भेट कौटुंबिक नसून यामागे काही मोठे राजकीय संकेत दडलेले आहेत का? असा सवाल आता केला जातोय. मनपावर ‘नारीशक्ती’चा दबदबा पुणे महापालिकेच्या नवीन सभागृहात तब्बल ८८ महिला नगरसेविका असणार आहेत. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया मोठया संख्येने नगरसेविका असणार आहेत. महापालिकेच्या १६५ जागांसाठी ३५० महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यातील ८८ महिला निवडून आल्या असून सभागृहात नारीशक्तीचा आवाज घुमणार आहे. यामुळे सत्ताधारी पक्ष महिलाशक्तीचा सन्मान करण्यासाठी महापौरपद महिला नसरसेविकेला देऊ शकतात. पालिकेत ७७ पुरूष नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणुकीसाठी एकूण जागांमधील ५० टक्के ( ८३ जागा) महिलांसाठी राखीव होत्या. अनेक राजकीय पक्षांनी यंदा खुल्या वर्गातील जागांवरही महिलांना संधी दिली होती. त्यामुळे, यावर्षी राखीव जागांपेक्षा पाच अधिक महिला सदस्या निवडून आल्या आहेत. त्यात सर्वाधिक ६७ महिला उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या आलेल्या आहेत. “महापालिका म्हणजे कमिशनचा धंदा नाही!” पुणे महापालिका निवडणूक निकालानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यानी स्पष्ट शब्दांत नगरसेवकांनी कसे काम करावे याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी महापालिका हे आपले कमिशन नाही आणि महापालिका हा आपला व्यवसायही नाही. पालिका हे आर्थिक, सामाजिक विकासाचं माध्यम आहे. त्यामुळे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे काम पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद, गैरकारभार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील नवनिर्वाचित उमेदवारांना दिला आहे. जिल्हा परिषदेसाठी भाजप-शिवसेना एकत्र, अजित पवारांना धक्का पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) एकत्र लढण्याची दाट शक्यता असून, आज दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या निकषांवर महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या सर्व प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) सोबत न घेण्याचा सूर उमटला. पुणे जिल्हा परिषदेतही भाजप-शिवसेना एकत्र निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुंबईच्या महापौरपदावर शिंदेंचा अडीच वर्षांसाठी दावा? यंदा मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही परिस्थितीत आपलाच महापौर बसवायचा, असा ध्यास भाजपने मनी बाळगला आणि मुंबईच्या निवडणुकीत 89 वॉर्ड जिंकून पक्ष या स्वप्नाच्या जवळही पोहोचला. एकनाथ शिंदे यांचे 29 नगरसेवक सोबत असल्याने मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता येणार, हे जवळपास निश्चित आहे. नेमक्या याचवेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपची गरज ओळखून एक मोठा डाव टाकलाय. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईच्या महापौरपदाची मागणी केली जाऊ शकते, असं म्हटलं जातंय. यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करा आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद एकनाथ शिंदे यांच्याकडून घातली जाऊ शकते. याशिवाय, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि सदस्य पदांवरही शिंदे सेनेकडून दावा केला जाऊ शकतो. तसे घडल्यास मुंबईच्या राजकारणात नवी रंगत निर्माण होऊ शकते. अक्कलकोटला जाताना काळाचा घाला ; अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू पनवेलवरून अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना भाविकांवर काळाने घाला घातलाय. पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एका कारचा शनिवारी रात्री उशिरा भयंकर अपघात झालाय. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये ३ पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. सर्वजण पनवेलहून एरटिका कारने अक्कलकोलटला देवदर्शनला जात होते, त्यावेळी मोहोळमधील देवडी पाटी याठिकाणी भंयकर अपघात झाला. देशभरात टोलनाक्यावर यापुढे पेमेंट फक्त FASTag किंवा UPI द्वारे होणार आपल्या राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करण्याची पद्धत यापुढे बदलणार आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे महामार्गांवर टोल भरण्याची पद्धत आता पूर्णपणे बदलणार आहे. केंद्र सरकार १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझावर रोख पैसे भरणे बंद करण्याची तयारी करत आहे. म्हणजेच आता लांब रांगेत वाट पाहण्याचा अन् रोख पैसे भरण्याचा त्रास आणि टोल बूथवर थांबण्याची सक्ती यापुढे संपणार आहे. नवीन प्रणाली अंतर्गत, वाहनचालकांना फक्त FASTag किंवा UPI द्वारे टोल शुल्क भरावे लागेल, जे डिजिटल प्रवासाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या नवीन निर्णयामुळे केवळ पैसे वाचणार नाहीत तर प्रवासाचा वेळही कमी होईल अन् प्रवास करणे सोपे होईल, असा सरकारचा विश्वास आहे. ट्रम्पच्या टॅरिफला फ्रान्सच्या अध्यक्षांचे सडेतोड उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडचे अमेरिकेत पूर्ण विलनीकरण करण्याची मागणी करणारी एक मोठी घोषणा केलीय. त्यांनी ग्रीनलँडच्या विक्रीला विरोध करणाऱ्या डेन्मार्क आणि इतर युरोपीय देशांवर कर लादण्याची धमकी दिलीय. सोशल मीडिया पोस्टमध्ये ट्रम्प यांनी घोषणा करत, १ फेब्रुवारी २०२६ पासून डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स आणि फिनलंड याठिकाणावरून अमेरिकेत येणाऱ्या सर्व वस्तूंवर अतिरिक्त १० टक्के कर लादला जाणार असल्याचं म्हटलंय. ट्रम्पच्या धमकीला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी थेट प्रत्युत्तर दिलंय. ‘युक्रेनमध्ये, ग्रीनलँडमध्ये किंवा इतर कुठेही अशा परिस्थितीत कोणताही धोका किंवा धमकी आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही.’ असं त्यांनी म्हटलंय.