– माधवी पत्की शेतकरी कायमच अस्मानी आणि सुलतानी (म्हणजे सरकारी) संकटाच्या कचाट्यात असतो. त्यामुळे कर्जबाजारीपणा, गरिबी, ससेहोलपट त्याच्या वाट्याला येते, हे पाहता तरुण पिढी शेती करायला धजावत नाही. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती आहे. ओलीताच्या शेतीचे प्रमाण फारच कमी. विदर्भ त्याबाबतीत वरच आहे. अशावेळी शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे पाऊस हा लहरी झाला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ हा शेतकर्यांच्या पाचवीलाच पूजला आहे. त्यामुळे दरवर्षी ठराविक उत्पन्न येईलच याची शाश्वती नाही. अशावेळी कर्ज घेऊन बियाणे वाया गेल्यास नुकसान होते. तसेच कीटकनाशक, रासायनिक खते, सेंद्रिय खते यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यासाठीही कर्ज घ्यावे लागते. शिवाय शेतमजुरी वाढली आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणजे उत्पादन खर्च वाढीवर होतो. त्यानुसार शेतमालाला भाव मिळत नाही. परिणामी नफ्याचे प्रमाण अत्यल्प असते. शिवाय मध्ये दलाल (अडते) हा एक खोळंबा आहेच. नाशवंत माल, डोक्यावर कर्जाचा भार, दैनंदिन जीवनातील समस्या यामुळे शेतकरी आपला शेतमाल साठवून ठेवू शकत नाही. पडेल त्या भावाला विकून टाकतो. या सगळ्याचा परिणाम म्हणजे कर्जबाजारीपणा आणि गरिबी. असे शेतीविषयक चित्र असल्यामुळे नवीन पिढी शेती व्यवसायाकडे धजत नाही. त्यांची धाव शहराकडे असते. जेणेकरून आपले जीवनमान आधीच्यापेक्षा उंचावेल अशी त्याला आशा वाटते. तरुण पिढी शेतीकडे न वळण्याचे एक कारण म्हणजे लग्नाकरता मुली न मिळणे. आज कुठल्याच मुलीला शेतकरी नवरा नको असतो. त्यामुळे आई-वडीलसुद्धा मुलाला शेती करण्यापेक्षा नोकरी कर असाच सल्ला देतात. कारण मुली शेतकरी नवरा न करण्यामागचं कारण म्हणजे आर्थिक अस्थिरता, कर्जबाजारीपणा. ही स्थिती शेतकर्यावर येण्याची अनेक कारणे आहे. वर्षानुवर्ष, पिढ्यान्पिढ्या त्याच पद्धतीने शेती करणे, तीच पारंपरिक पिके घेणे जसे कापूस, तूर, मूग, गहू मात्र लहरी पावसामुळे एकदा पीक बुडाले की मग हाती काहीच लागत नाही. जर पीक भरपूर आले तर भाव मिळत नाही. कारण ही पिके भारतात सगळीकडेच विपुल येतात. त्यामुळे भाव पाडले जातात. ज्या पिकांना मागणी आहे अशी पिके घेतल्यास भाव चांगला मिळतो. ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायाने पिके घ्यावी लागतात. परंतु शेतकर्यांची कोणताही धोका पत्करायची तयारी नसते. त्यामुळे त्याच त्या चक्रात आजचा शेतकरी अडकला आहे. शेतीविषयी सरकारची उदासीनता हासुद्धा एक मोठा घटक यामागे आहे. सरकारी योग्य विपणन व्यवस्था, माल साठवणुकीच्या सोयी, उत्पादनावर आधारित भाव, कमी व्याजदर आणि कर्ज, स्वस्त बियाणे, स्वस्त खते अशा सुविधा पुरविल्यास शेती पुन्हा फायद्यात येऊ शकते. पण सरकारी उदासीनतेमुळे शेतीची दुरवस्था होते आहे. त्याचाच परिणाम नवीन पिढी शेती करण्यास धजावत नाही. याशिवाय पारंपरिक शेतीच करत राहिल्याने व त्यात विविधता न आणल्याने शेती तोट्यात येऊ लागली. त्यामुळेसुद्धा तरुणांनी याकडे पाठ फिरवली. पारंपरिक शेती करणार्या शेतकर्यांच्या नवीन पिढीने जरी शेतीकडे पाठ फिरवली असली तरी गेल्या पंधरा-वीस वर्षांत अनेक शिक्षित, उच्चशिक्षित, अॅग्रीकल्चर पदवीधर या नवीन तरुणांनी शेतीला व्यवसाय समजून त्यात प्रदार्पण केले आहे. अनेक तरुण नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान वापरून शेती एक उद्योग म्हणून करत आहे आणि त्यात यशस्वीसुद्धा झाले आहेत. फुलांची मागणी बाराही महिने असते त्यासाठी फुल झाडांची लागवड करून भरपूर उत्पन्न घेऊ शकतो. त्याचप्रमाणे फळझाडांची लागवड करूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतो. तसेच भाज्यांची लागवड, आले, लसूण यातून भरपूर नफा मिळू शकतो आणि या उत्पन्नात उधारी हा भाग पण राहत नाही. पण त्यासाठी सिंचनाच्या सोयी असाव्या लागतात. बरेच मराठी तरुण हा व्यवसाय सध्या करीत आहे आणि त्यात यशस्वी होत आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाची अनास्था कमी होत जाईल.