Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सध्या वाद आणि चौकशीच्या भोवऱ्यात अडकला असतानाच पक्षात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत पक्षाचे रणनीतीकार नरेश अरोरा यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणामुळे आधीच पक्षावर दबाव वाढला असून रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांना पुन्हा काम देऊ नये, असा ठाम सूर अनेक वरिष्ठ नेत्यांनी लावला. अजित पवार यांच्या निधनानंतर अरोरा यांनी पक्षातील आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केल्याची नाराजी नेत्यांमध्ये होती. याच कारणामुळे त्यांना पुन्हा संधी देऊ नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. अखेरीस अरोरा यांचे कंत्राट संपुष्टात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या पहिल्याच कोअर कमिटी बैठकीत अरोरा यांनी मांडलेल्या काही कल्पनांवरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळीही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि अरोरा यांना बैठकीतून बाहेर जावे लागले होते. नरेश अरोरा यांची ‘डिझाईन बॉक्स’ कंपनी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीसाठी काम करत होती. अजित पवार यांच्या सभांचे नियोजन, प्रतिमा निर्मिती आणि प्रचार रणनीती तयार करण्यात या कंपनीची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, वाढत्या वादामुळे अखेर पक्षाने त्यांच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.