Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदल करण्यावरून पक्षात अंतर्गत संघर्ष तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असमाधानी असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर 16 फेब्रुवारी रोजी तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या स्वाक्षऱ्यांचे एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले होते. या पत्राद्वारे पक्षाच्या घटनेत बदल करून कार्याध्यक्षांना अधिक अधिकार देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. विशेषतः प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अधिक अधिकार देण्याचा या पत्राचा उद्देश असल्याची चर्चा आहे. या घडामोडींनंतर सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून संबंधित पत्रव्यवहार अमान्य समजावा, अशी मागणी केली होती. यामुळे पक्षात संशयाचे वातावरण निर्माण झाले आणि दोन गट पडल्याची चर्चा रंगली. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांना स्पष्टीकरण देण्यासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेतला. वांद्रे येथील एमईटी येथे झालेल्या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीला धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ उपस्थित होते. यानंतर झालेल्या बैठकीत तटकरे आणि पटेल यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार समाधानी नसल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.