अमरावती : भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या डायल 112 या क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करुन नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू, असा फोन पोलिसांना आला होता. याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही नवनीत राणा यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथील भाषणानंतर त्यांना धमकी देण्यात आली होती. महानगरपालिका निवडणुकीमध्ये अमरावतीत भाजप आणि आमदार रवि राणा यांच्या पक्षाला यश मिळाले आहे. महापालिका विजयानंतर राणा दाम्पत्याने विजयाचा आनंद साजरा केला. मात्र, या निवडणुती एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नवनीता राणांवर केलेली टीका चांगलीच चर्चेत आली होती. या संदर्भात नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे.