नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल Top 10 News : महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर एका 65 वर्षांच्या नराधमाने अत्याचार करून तिची निघृर्णपणे हत्या केली. या घटनेनंतर महाराष्ट्र हादरला असून, संतापाची लाट उसळली आहे. आता या घटनेची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली असून, पोलिस प्रशासनाला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे केवळ अमानवीय कृत्य नसून मुलांच्या हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे, असे म्हटले आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या प्रकरणावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत करा, जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि वेळेत दोषारोपपत्र दाखल करा अशा सूचनाही दिल्या आहेत. या प्रकरणी महिला आयोगाने महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. लाठीचार्जचा पुणे पोलिसांकडून इन्कार पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.राज्य सरकार आणि पोलिसांकडून आरोपीवरील कारवाईबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पिडीत मुलीचा मृतदेह घेऊन पुण्यातील नवले ब्रीजवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे पुणे बंगळुरु महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प होती. मात्र याविषयीची कोंडी न सुटल्याने पोलिसांनी लाठीचार्ज करून मार्ग मोकळा केला. परंतु, पोलिसांनी लाठीचार्ज न केल्याचा दावा करत पीडितेच्या पालकांना समजूत घालून बाहेर काढल्याचं म्हटलंय.त्यासोबतच राज्य सरकार आणि पोलीस या प्रकरणात फास्ट ट्रॅकवर कारवाई करतील. आरोपपत्र लवकरात लवकर दाखल केले जाईल. मुलीचे कुटुंबीय म्हणतील, तो वकील दिला जाईल. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, असे आश्वासन आम्ही पिडीत मुलीच्या कुटुंबीयांना दिल्याच अमितेश कुमार यांनी म्हटलंय. आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही बीडच्या नेकनूरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी दोन गटात दगडफेक आणि मोठा राडा झाला होता. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नेकनूरमध्ये आल्यानंतर सुचक इशारा दिलाय. त्यांनी याविषयी बोलताना त्यादिवशी नेकनूरमध्ये काहीतरी झालं होतं, त्यावेळी महाराजांना फोन करून विचारलं होतं, यायचं आहे का? कधीही हाक मारा सगळ्यात आधी आम्ही उभे आहोत, सगळे संकटं आम्ही आमच्या अंगावर घ्यायला तयार आहोत. आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, होऊ द्या जे व्हायचे ते, मात्र ज्यांनी हे केलं त्या चार दोन लोकांसाठीच बाकीच्यांचा काही दोष नाही, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नेकनूरमधून दोन गटात झालेल्या राड्यानंतर सूचक वक्तव्य केलंय. माझ्या खांद्यावरून राजकारणाची पोळी भाजू नका महायुतीने २१ एप्रिलला मुंबईत मोर्चा काढला होता. मुंबईतील वरळीत संध्याकाळच्या सुमारास हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाली होती, त्यावेळी एका महिलेनं मंत्री गिरीश महाजन यांना सुनावलं होतं.या महिलेचं नाव आहे टीना चौधरी. मंत्र्यांनाच खडसावल्यानंतर अनेकांनी या महिलेला ट्रोल केलं तर काहींना त्यांना शेरणी म्हणून उपाधी दिली. परंतु आता या टीना चौधरी यांचा त्या घटनेबद्दलचा एका व्हिडिओ आला आहे. टीना चौधरी यांनी या व्हिडिओतून आपण का संताप व्यक्त केला. राजकारण करू नका? असं म्हणत माझ्या खांद्यावरून राजकारणाची पोळी भाजू नका असं म्हणाल्या आहेत. या महिलेनं सर्व राजकीय पक्षांना केलं आहे. सोबतच त्यावेळी केवळ गिरीश महाजन हे एकमेव व्यक्ती होती, ज्यांनी माझं ऐकून घेतलं, असं टीना चौधरी म्हणाले आहेत. “झेंडा हाती घेतला तरी अजेंडा बदलणार नाही Top 10 News : बच्चू कडू यांनी प्रहार राजकीय पक्ष विलीन करुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हे विलीनीकरण आणि पक्षप्रवेश झाला आहे. या प्रवेशावर बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केली. “झेंडा हातात घेतला असला तरी अजेंडा बदलणार नाही”, असे कडू यांनी सांगितलं. सत्तेशिवाय पक्ष चालवणे फार कठीण असल्याची कबुली कडू यांनी दिली. याशिवाय त्यांचा राजकीय प्रवास, शेतकरी आंदोलन आणि विविध विषयांवर कडू यांनी भाष्य केलंय. १२ वीत नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल शनिवारी अधिकृत जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भंडाऱ्यातील एका तरूणाने आयुष्याचा दोर कापलाय. नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या १८ वर्षाच्या तरूणाने आत्महत्या केली. लेकाने आत्महत्या केल्याने आई-वडिलांना जबर धक्का बसला. गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याच्या धक्क्यातून १८ वर्षीय नावेद होलाराम खंडाते या तरुणाने शेतात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. रोंघा येथील रहिवासी असलेला नावेद खंडाते याने यंदा बारावीची परीक्षा दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर आपण अनुत्तीर्ण झाल्याचे समजताच तो मानसिक तणावात होता. याच नैराश्यातून शनिवारी दुपारी त्याने गावाजवळील शेत गाठले आणि तिथे गळफास लावून आत्महत्या केली. जनावरांच्या चरबीपासून भेसळयुक्त तूप सण-उत्सवाच्या काळात आपण मोठ्या आवडीने तूप खरेदी करतो, पण हेच तूप तुमच्या आरोग्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. मध्य प्रदेशातील खांडवामध्ये प्रशासनाने एका अशा कारखान्यावर छापा टाकलाय, गावरान तूप नव्हे तर थेट जनावरांची चरबीचं सापडलीय. जनावरांची हाडं, चामडं आणि चरबी उकळून त्यापासून भेसळयुक्त तूप बनवण्याचा हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानं संपूर्ण देश हादरलाय. खांडवा शहरातील इमिलीपुरा भागात अनेक दिवसांपासून दुर्गंधी पसरली होती. वारंवार तक्रार देऊनही याप्रकरणात प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही. अखेर संतापलेल्या नागरिकांनी रेटा लावला आणि शहर दंडाधिकारी, पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाने ‘बेगम पार्क’ परिसरातील तूप बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. या धाडीत तब्बल 1380 किलो जनावरांची चरबी, 2700 लिटर चरबीचं तेल आणि 8 क्विंटल हाडं आणि चामडं जप्त करण्यात आलं. 2015 पासून म्हणजे तब्बल 11 वर्षांपासून हा कारखाना या भागात असूनही प्रशासनाला याची कुठलीच माहिती नव्हती. या कारखान्यात तूपसदृश्य पदार्भ तयार करण्यासाठी 138 जनावरांची कत्तल केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. “इराणने अद्याप किंमत चुकवलेली नाही” इराणने अमेरिकेच्या पाठिंबा असलेल्या ९-मुद्द्यांच्या प्रस्तावाला १४-मुद्द्यांच्या विस्तृत योजनेद्वारे अधिकृतपणे उत्तर दिले असून, सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आपल्या अटी मांडल्या आहेत. दरम्यान , इराणच्या या प्रस्तावावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिलीय. डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयी बोलताना, इराणने नुकत्याच पाठवलेल्या प्रस्तवाचे परीक्षण मी लवकरच करणार आहे. पण मला वाटत नाही की मी तो प्रस्ताव मान्य करेन, कारण गेल्या ४५ वर्षांत इराणने मानवता आणि जगासाठी जे काही केलंय, त्याची किंमत चुकवलेली नाही. असं म्हणत पुन्हा एकदा इराणला धमकीवजा इशारा दिलाय. मुंबई इंडियन्सचे आयपीएल 2026 मधून पॅकअप आयपीएल 2026 मधील 44 व्या थरारक सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आपला प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सवर (MI) 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) रंगलेल्या या ‘एल क्लासिको’ सामन्यात चेन्नईने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मुंबईला मागे टाकले. या विजयासह चेन्नईने प्लेऑफच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखले आहे, तर मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास आता संपुष्टात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, या हंगामात चेन्नईने मुंबईला दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. यापूर्वी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातही चेन्नईने मुंबईवर मात केली होती. त्यामुळे या हंगामात चेन्नईने मुंबईविरुद्ध ‘क्लीन स्वीप’ दिला आहे. या विजयामुळे चेन्नईचे 8 गुण झाले असून ते गुणतालिकेत 6व्या क्रमांकावर पोहोचले आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या चेन्नईच्या आशा आता जिवंत आहेत. …तरच हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं Top 10 News : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर नातेवाईक आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर ग्रामस्थांसह नातेवाईक आक्रमक झाले आहेत. या घटनेवर मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत अभिनेते प्रवीण तरडे आक्रमक झाले आहेत. नराधमाचा एन्काऊंटर झालं तरच हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचं आहे असं म्हणत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. एन्काऊंटर झालं नाही तर भोरच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा, अशी आक्रमक पोस्ट प्रवीण तरडे यांनी केली आहे. नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी चिमुकलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले.