नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या (Nashik Politics) प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर मतदानाच्या अगदी काही तास आधी शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अधिकृत प्रचार संपुष्टात आला असला तरी पडद्यामागील घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक २९ मध्ये घडलेल्या घटनांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. मनसे आणि उबाठाचा जाहीर पाठिंबा या प्रभागातील अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) ने जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसेकडून अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, याशिवाय उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेनेदेखील (उबाठा) त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती आहे. हे पाठिंबे मतदानाच्या तोंडावर आल्याने निवडणुकीच्या समीकरणांमध्ये अचानक मोठा बदल झाला आहे. मुकेश शहाणे हे मूळचे भाजपचे नेते आणि माजी नगरसेवक आहेत. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग २९ मधून विजय मिळवला होता. यावेळी भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती, मात्र उमेदवारी प्रक्रियेदरम्यान एबी फॉर्मचा गोंधळ निर्माण झाला. दीपक बडगुजर यांनी आधी फॉर्म भरल्याने मुकेश शहाणे यांचा फॉर्म बाद झाला. यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या बंडखोरीमुळे भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून पक्षातून बाहेर काढले. भाजप उमेदवार दीपक बडगुजर यांना मोठा फटका भाजपकडून प्रभाग २९ (अ) मधून दीपक बडगुजर हे अधिकृत उमेदवार आहेत. मनसे आणि उबाठाच्या पाठिंब्यामुळे मुकेश शहाणे यांच्या प्रचाराला नवे बळ मिळाले आहे. मनसेचे मतदार, उबाठाचे कार्यकर्ते तसेच भाजपमधील नाराज गटाची मते शहाणे यांच्या बाजूने वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे दीपक बडगुजर यांना मोठा राजकीय धक्का बसला असून, ही लढत अटीतटीची झाली आहे. प्रभाग २९ मधील पार्श्वभूमी आणि ड्रामा प्रभाग क्रमांक २९ मध्ये निवडणूक जाहीर होताच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला होता. सुरुवातीला भाजपने मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर दोघांनाही उमेदवारी दिली होती. मात्र, एबी फॉर्मच्या तांत्रिक अडचणींमुळे (एकाच प्रभागात दोन फॉर्म) शहाणे यांचा अर्ज बाद झाला. अन्याय झाल्याची भावना असतानाही त्यांनी माघार घेतली नाही आणि अपक्ष लढत कायम ठेवली. यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढली होती. आता मनसेने दिलेल्या या पाठिंब्यामुळे प्रभागातील राजकीय गणिते पूर्णपणे बदलली आहेत. ही लढत फक्त दोन उमेदवारांपुरती मर्यादित न राहता महाविकास आघाडीशी संबंधित पक्षांच्या रणनीतीचा भाग बनली आहे. ही खेळी नाशिक महापालिका निवडणुकीतील एक प्रमुख टर्निंग पॉइंट ठरणार आहे.