Nashik Bribe: नाशिकमधील राज्य जीएसटी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका खासगी दलालाला महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी अटक केली. जीएसटी चौकशी निकाली काढण्याच्या बदल्यात या तिघांनी एका व्यापाऱ्याकडून २० लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नाशिक विभागातील राज्य कर (जीएसटी) कार्यालयाचे उपायुक्त सोमनाथ दत्तू पगे (वय ४७), सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंडे (वय ५५) आणि खासगी दलाल अमित हिरामण जाधव (वय ३६) यांचा समावेश आहे. काय आहे प्रकरण? एका व्यापाऱ्याच्या कंपनीविरोधात जीएसटी चौकशी सुरू होती. ती चौकशी निकाली काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सुरुवातीला तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांची मागणी केली. वाटाघाटीनंतर ही रक्कम १ कोटींवर आणण्यात आली आणि पहिला हप्ता म्हणून रोखीने २० लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. लाच द्यायची नसल्याने व्यापाऱ्याने मुंबईतील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची सत्यता पडताळल्यानंतर एसीबीने ६ मार्च रोजी गुन्हा नोंदवून सापळा आखला. त्यानुसार दलाल अमित जाधव नाशिकमधील दामोदर चौकातील व्यापाऱ्याच्या कार्यालयात पहिला हप्ता घेण्यासाठी आला असता त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. घरझडतीत सापडले २ लाख रोख – जाधवाच्या चौकशीत पगे आणि दोंडे यांची नावे समोर आली. त्यानंतर एसीबीने उपायुक्त पगे यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता २ लाख रुपये रोख आढळून आले. दोंडे व जाधव यांचे मोबाईल फोन तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. तिन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.