Maharashtra Politics : महाराष्ट्रच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड होण्याची चिन्हे दिसत आहेत. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रिपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. मंत्रालयात एसीबीची कारवाई मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापेमारी करून झिरवळ यांच्या कार्यालयातील क्लर्क राजू ढेरिंगे यांना ५० हजार रुपयांची लाच मागताना रंगेहात पकडल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तक्रारदार हरीराम घाणशी यांना सोबत घेत एसीबीने मंत्रालयात सखोल चौकशी केली. महत्त्वाची कागदपत्रे आणि काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. तसेच झिरवळांचे खासगी सचिव रामदास गाडे यांना पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान मंत्रालयातील कथित ‘रेटकार्ड’ही उघड झाल्याची चर्चा आहे. फाईलवर एक ओळ टाकण्यासाठी ५० हजार, तर दोन ओळींसाठी एक लाख रुपयांची मागणी होत असल्याचा दावा समोर आला आहे. त्यामुळे झिरवळ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कराड कनेक्शन उघड झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर नाशिकमधील बोगस कागदपत्र प्रकरणात न्यायालयीन निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांचेही मंत्रिपद गेले. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयात लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्याने झिरवळ यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी गटातील तिसरी विकेट पडणार का? सुनेत्रा पवार झिरवळांना पाठिंबा देणार की विरोधकांना रोखण्यासाठी कठोर निर्णय घेतला जाणार? या सर्व घडामोडींवर राज्याचे लक्ष लागले आहे.