नागपूर : केंद्रातील भाजप सरकार महागाई आणि रुपयाच्या घसरणी सारख्या महत्त्वाच्या मुद्यांवरुन लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा, कॉंग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी केला. सोमवारपासून सुरु हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यावेळी विधान भवन परिसरात नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पटोले यांना पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशिदीच्या धर्तीवर बांधलेल्या मशिदीची पायाभरणी करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या निलंबित आमदाराच्या आणि कोलकाता येथे झालेल्या मेगा भगवद्गीता पठणाच्या घडामोडींबद्दल विचारणा करण्यात आली. यावेळी पटोले म्हणाले की, सरकारला महागाईची चिंता नाही आणि रुपयाचे मूल्य घसरत आहे. परंतु, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक वाद निर्माण केले जात आहेत. गेल्या १२ वर्षांत देशाची परिस्थिती बिकट होत असताना सरकार केवळ मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा देखील त्यांनी केला.