यवतमाळ : महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अनेक ठिकाणी प्रस्थापित नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लाखो रुपये खर्च करूनही मोठ्या नेत्यांना जनतेने नाकारले आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील नेर नगर पंचायतीत एका तरुण उमेदवाराने कोणतेही राजकीय पाठबळ, आर्थिक बल नसताना केवळ लोकवर्गणीच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवसेना (शिंदे गट)चे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात हा पराभव त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सचिन उर्फ जांभा कैलास कराळे असे या विजयी उमेदवाराचे नाव आहे. राजकीय पार्श्वभूमी नाही, खिशात पैसे नाहीत, स्वतःचे बँक खातेही नाही अशा परिस्थितीत जांभाने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि प्रस्थापित नेत्याला पराभूत करत विजय खेचून आणला. नेरमध्ये त्याची ओळख ‘ज्याचा कोणी नाही, त्याचा जांभा’ अशी आहे. जांभा हा निस्वार्थी सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. स्वतःचे हक्काचे घरही नाही. गेली अनेक वर्षे तो कधी रुग्णालयात, कधी मित्राच्या हॉटेलमध्ये मुक्काम करून राहतो. तरीही तो गरीब रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असतो. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक गरजू रुग्णाला तो आधार देतो. गरीबांचे प्रश्न सोडवणे, रुग्णसेवा करणे अशी त्याची जनसेवा नेरमध्ये सर्वपरिचित आहे. याच निस्वार्थ कामाची पोचपावती नेरच्या जनतेने निवडणुकीत त्याला दिली. प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष उमेदवार म्हणून उतरलेल्या जांभासमोर शिवसेना (शिंदे गट)चे सुभाष भोयर हे मजबूत प्रतिस्पर्धी होते. भोयर हे गेली १५ वर्षे नगरसेवक राहिलेले आणि राजकारणात मोठा अनुभव असलेले मातब्बर नेते आहेत. तरीही जांभाने त्यांना पराभूत केले. निवडणुकीसाठी लागणारा खर्च जनतेने स्वतःहून लोकवर्गणी गोळा करून भागवला. मित्रांनी त्याला निवडणूक लढवण्यासाठी कपडेही शिवून दिले. ‘निवडणूक ही पैशाने नव्हे, तर जनतेच्या मनाने जिंकली जाते’, हे जांभाच्या या विजयाने सिद्ध झाले आहे. प्रस्थापितांच्या अनुभवावर आणि पैशांच्या बळावर जनसेवेची खरी ताकद विजयी ठरली. नेरमध्ये जांभाचा हा विजय साजरा होत असून, सामान्य कार्यकर्त्याला जनतेने दिलेला हा विजय इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.